वर्षा कांबळे
पिंपरी: शहरातील पदपथावर खाद्यपदार्थ विक्रेते, मांस, चिकन विक्रेते शिल्लक व शिळे अन्नपदार्थ फेकून देतात. त्यामुळे मोकाट व भटक्या श्वानांची संख्या वाढत असल्याचा दावा पिंपरी चिंचवड महापालिका पशुवैद्यकीय विभागाकडून केला जात आहे; मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. पुणे महापालिकेतर्फे श्वानांची नसबंदी करण्याचे कंत्राट दिलेल्या संस्था पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या परिसरात हे भटके श्वान आणून सोडतात. त्यामुळे शहर परिसरात श्वानांच्या संख्येत वाढ होत असल्याचे शहरातील प्राणीमित्रांनी निदर्शनास आणून दिले आहे.
शहरात एक लाखांच्या आसपास भटक्या श्वानांची संख्या असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. भटकक्या श्वानांच्या चाव्यामुळे तसेच त्यांच्या हल्ल्यामध्ये अपघात होऊन जखमी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. लहान मुलांवर हल्ला करून चावे घेण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी असलेले भटके श्वान पकडून निवारागृहात ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. महापालिकेची निवारागृह अपुरी असल्याने या श्वानांना कोठे ठेवायचे, असा प्रश्न महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागासमोर निर्माण झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट आणि भटक्या श्वानांची समस्या कायम असून मागील सात महिन्यांत 20 हजार 664 जणांचा श्वानांनी चावा घेतला आहे. रात्रीच्या वेळी वाहने व पादचाऱ्यांवर कुत्री धावून जातात. कुत्रे अचानक अंगावर आल्याने त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी चालक वाहने वेगात चालवितात. यामुळे अपघाताच्या घटना घडतात. रात्री रस्त्यांवरुन जाताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते.
मागील दहा वर्षात एक लाख 70 हजार 840 जणांचा श्वानांनी चावा घेतला आहे. मोकाट श्वानांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून मोकाट श्वान पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली जाते. मागील पाच वर्षात 43 हजार 680 भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. तरीही बाहेरील श्वानांना शहरात सोडल्याने शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर होत आहे. या प्रश्नी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संबंधित विभागाने त्वरित लक्ष घालणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पुण्यातील खासगी संस़्था रात्रीच्या वेळी परिसरात श्वान आणून सोडतात. त्यांच्या गाडीवर कोणत्याही संस्थेचे नाव किंवा लोगो नसतो. चऱ्होली आणि आसपासच्या परिसरात 300 - 400 कुत्री सोडण्यात आली आहेत. माझ्या घराजवळ पहिले दोनच कुत्री होती. आता 40 कुत्री आली आहेत. हे श्वान, चावणे, चपला पळविणे, गाड्याचे सीट फाडणे, असे नुकसान करतात. या परिसरात 40 ते 50 कुत्र्यांचा घोळका बसलेला असतो. आम्ही याबाबत पशूवैद्यकीय विभागास देखील पत्र दिले आहे. तसेच पुण्यातील पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांना देखील भेटलो. पण अजून कोणतीच कार्यवाही केली नाही.विक्रम भोसले ( रेस्क्यू टीम वनविभाग)
स्वयंघोषित प्राणीप्रेमी
यामध्ये काही स्वयंघोषित पशुप्रेमी आहेत जे पैशासाठी श्वानाचे पुनर्वसन करतात ते रिक्षा किंवा त्यांच्या स्वत: च्या गाडीमध्ये श्वान भरतात आणि शहरभर रात्रीच्या वेळी कुठेही सोडतात. यामुळे जे प्राणीप्रेमी खरोखर प्रामाणिकपणे काम करतात त्यांना या गोष्टीचा त्रास होतो. स्थानिक नागरिक त्यांना नाहक कारणीभूत ठरवितात.
चऱ्होली परिसरात पुणे परिसरातील भटके श्वान आणून सोडत असल्याबाबत येथील स्थानिकांचे तसेच प्राणीमित्रांचे आम्हांला कॉल आले आहेत. सदरील परिसरात महापालिकेकडून मॉनिटरींग करून याबाबत पुणे महापलिकेला कळविण्यात येईल.डॉ. अरूण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी पिं.चिं. मनपा
श्वान सोडणाऱ्या गाड्यांवर नाहीत नावे
पूर्वीच्या श्वान पकडण्याच्या ज्या गाड्या होत्या त्यांच्यावरचा लोगो काढण्यात आला आहे. पालिकेने कंत्राट बंद केले आहे तरी या गाड्या का फिरतात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. किती श्वान पकडले, कितींचे निर्बिजीकरण केली याचे कोणतेच रेकॉर्ड नाही. तसेच ही गाडी रात्री फिरते. खरे तर रात्री 8 नंतर श्वानांना पकडण्याची परवानगी नाही. याबाबत प्रशासनाने देखरेख ठेवणे गरजेचे आहे. यामध्ये चऱ्होलीतील साई मंदिर, खडी मशीन रोड, ताजणे मळा, पठारे मळा, पिराचे मंदिर, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज, भोसले वस्ती, पठारे चौक, जिजामाता मंदिर या परिसरात भटेक श्वान सोडले जातात.
श्वान पकडणाऱ्या संस्था दुसऱ्या शहराच्या हद्दीत श्वान सोडत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.डॉ. सारिका भोसले पशुवैद्यकीय अधिकारी, पुणे मनपा