

नवी सांगवी: हिंजवडी येथील भीषण बस अपघातात तीन भावंडांचा मृत्यू झाल्याची घटना अजून ताजी आहे. या अपघातातून गंभीर जखमी अवस्थेत वाचलेली 18 वर्षीय प्रिया देवा प्रसाद अखेर मृत्युमुखी पडली. तिचा मृत्यू हा अपघातामुळे जितका झाला, तितकाच आरोग्य व्यवस्थेच्या दुर्लक्षामुळे झाल्याची भावना आता नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
प्रिया प्रसाद हिला औंध जिल्हा रुग्णालयातून वायसीएम व नंतर ससून रुग्णालयात उपचारासाठी नेण्याची वेळ का आली? हा प्रश्न आता फक्त एका कुटुंबाचा राहिलेला नाही, तर तो संपूर्ण जिल्ह्याचा प्रश्न झाला आहे. जिल्हा रुग्णालयात प्रियाची प्राथमिक तपासणी झाली. मात्र, तिच्या मेंदूतील जखम गंभीर होती आणि जिल्हा रुग्णालयात न्यूरोसर्जन व न्यूरो संबंधित उपचारपद्धती उपलब्ध नसल्याने तिला वायसीएम व नंतर ससून रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ही विलंबाची प्रक्रिया प्राणघातक ठरली.
हिंजवडीमध्ये झालेल्या अपघातानंतर अपघातग््रास्ताना औंध जिल्हा रुग्णालयात प्रथम आणण्यात आले. त्यानंतर ससून जनरल हॉस्पिटल संदर्भ सेवा दिली. रुग्णालयात न्यूरो सर्जन नसल्याने अपघातग््रास्ताचा मृत्यू झाला. राज्यातील आरोग्य व्यवस्था ही मरणपंथाला आली असून तज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे राज्य शासन आरोग्य सेवा देण्यास असमर्थ आहे यावरून स्पष्ट दिसत आहे.
शरत शेट्टी, उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवाधिकार
प्रियाला हलविण्यापूर्वी, हलवताना आणि उपचार मिळेपर्यंत रक्तस्त्राव सुरूच होता आणि शेवटी तिचं हृदय थांबलं. औंध जिल्हा रुग्णालय नाव मोठं, मात्र अद्यावत सुविधा असलेले जिल्ह्यातील सर्वात मोठे शासन रुग्णालय आहे. परंतु येथे न्यूरो सर्जन, ट्रॉमा केअर युनिट, तत्काळ सर्जिकल टीम, अत्याधुनिक उपकरण सुविधा नसल्याने आलेला अत्यावश्यक रुग्ण दुसऱ्या हॉस्पिटलला पाठविला जातो. शासन मात्र घोषणा करते, मोफत उपचार योजना देत आहे. “मोफत उपचारांची जाहिरात नको, आधी डॉक्टर द्या, मशीन द्या, जीव वाचवा.” नागरिकांचा उद्रेक थेट अशा वाक्यातून बाहेर आला. आज प्रियाचे निधन या सिस्टीमचे ताजे उदाहरण आहे. हा अपघात नव्हे, व्यवस्थेचा मृत्यूदंड आहे.
सदर प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.
प्रकाश आबिटकर, आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य
जीव वाचवणारी यंत्रणा नसल्याने प्रियाचा मृत्यू
प्रियाच्या मृत्यूने जिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा व अत्यावश्यक उपचार उपलब्ध नसल्याने प्रिया सारखे रुग्ण रेफर प्रक्रियेतच मृत्यूला सामोरे जात आहेत. सरकार मोफत उपचारांची जाहिरात करते, पण प्रत्यक्षात सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. प्रियाचा मृत्यू हा अपघात नव्हे, तर व्यवस्थेचे अपयश आहे.
जिल्हा रुग्णालय हे लेव्हल 2 चे हॉस्पिटल असल्यामुळे येथे न्यूरो सर्जनची नियुक्ती नसते. त्यामुळे अशा उपचारांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज आहे. त्यासाठीचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला आहे. संबंधित रुग्णाला गंभीर हेड इंजुरी असल्याने त्वरित न्यूरो सर्जनची आवश्यकता होती, त्यामुळे रुग्णाला पुढील उपचारांसाठी रेफर करण्यात आले.
नागनाथ यंम्पल्ले, शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय.
हलगर्जीपणा झाला असेल तर त्याची निश्चितच चौकशी केली जाईल. संबंधित विभागाकडून संपूर्ण तपास करण्यात येईल आणि दोषी आढळल्यास आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.
शंकर जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा