

पिंपरी: हिंजवडी आयटी पार्कमध्ये झालेल्या बसच्या भीषण अपघातामुळे शहरातील खासगी प्रवासी बसचा मुद्दा उपस्थित झाला आहे. कंपन्या, आस्थापना, आयटी पार्क या ठिकाणी कर्मचार्ऱ्यांना ये-जा करण्यासाठी खासगी बसची शहरात मोठी संख्या आहे. दरम्यान, वाहतूक पोलिस, आरटीओ या माध्यमातून कारवाई सुरू असूनदेखील बसचालकांचे नियमभंगाचे प्रकार वाढत आहेत. पोलिसांकडून तब्बल 289 तर, आरटीओकडून दोन महिन्यांत 428 प्रवासी वाहनांवर कारवाई केली आहे.
आरटीओ पथक कूचकामी
पिंपरी-चिंचवड शहरात आयटी पार्क सोबतच एमआयडीसी आणि इतर कारखानेदेखील आहेत. येथील कर्मचारी, अधिकारी यांना ये-जा करण्यासाठी कंपन्यांच्यावतीने बससेवा पुरवली जाते. तसेच, पुण्यातून, तळेगाव, चाकण या परिसरातूनदेखील बस शहरात येतात. दरम्यान, या बसकडून मोठया प्रमाणात नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. परिणामी, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेले आरटीओ विभाग कुचकामी ठरत असल्याचे दिसून येते.
कंपन्यांच्या बसमुळे वाहतूककोंडी
केवळ हिंजवडीच नव्हे, तर पिंपरी चिंचवड शहरात या बसमुळे वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात भर पडत आहेत. त्यातच खासगी ट्रॅव्हल्स, प्रवासी बसेस आणि या कंपन्यांच्या बसेवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. बस पुरवठार कंपन्या, संबंधित आस्थापना आणि ठेकेदार यांनी चालकांची वैद्यकीय तपासणीबरोबरच बेथ ॲनलाझरदेखील ठेवण्यात यावे, अशा सूचना पोलिसांनी दिलेल्या आहेत. मात्र, त्याचे कोणी पालन करताना दिसून येत नाही.
सहा महिन्यांत अडीच हजार वाहनांची तपासणी
आरटीओने गेल्या सहा महिन्यांत 2 हजार 706 वाहनांची विविध ठिकाणी तसेच, गर्दीच्या परिसरात वेगात धावणार्ऱ्या प्रवासी बसेस, ट्रॅव्हल्सची तपासणी केली. यात तब्बल 902 दोषी आढळले. त्यानुसार यावर कारवाई करत 61 लाखांचा दंड वसूल केला आहे. त्याचप्रमाणे वाहनचालकांना पुन्हा नियमभंग न करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.
नियमांचे उल्लघंन, पोलिसांकडून प्रयत्न फोल
शहरात विविध ठिकाणी अवजड वाहनांना ठराविक वेळेत प्रवेश आहे. मात्र, तरीदेखील अनेक वाहने शहरात शिरतात. तसेच, प्रवासी बस, कंपन्याच्याकडून सर्वांधिक नियमांचे भंग होतात. वेगमर्यादा न पाळणे, सिग्नलाचे नियम न पाळणे, झेबा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे, मद्यपान करून वाहन चालवणे, गाणी वाजवणे यावरदेखील नियंत्रण राखणे आवश्यक आहे.
अवजड वाहने, प्रवासी वाहनांची वेळोवेळी तपासणी सुरू आहे. त्यासाठी स्वतंत्र वायुवेग पथक कार्यरत आहे. हिंजवडी परिसरातदेखील तपासणी सुरू आहे. नियभंग करणार्ऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे.
राहुल जाधव, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी