ST Bus pudhari photo
पिंपरी चिंचवड

ST Parcel Service: एसटीची पार्सल सेवा तीन महिन्यांपासून ठप्प; व्यापारी, नागरिकांची गैरसोय

कंत्राटी एजन्सीचे कंत्राट संपल्याने सेवा बंद; नवीन एजन्सी नियुक्तीची प्रक्रिया सुरू

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कमी खर्चात पार्सल पाठविण्याची सुविधा गेल्या तीन महिन्यांपासून ठप्प आहे. कंत्राटी एजन्सीचे कंत्राट संपुष्टात आल्यानंतर ही सेवा बंद झाली असून, नवीन एजन्सी नियुक्तीची प्रकिया सुरु आहे. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांची गैरसोय होत आहे.

एसटी बसस्थानकांवर पार्सल बुकिंगची सुविधा उपलब्ध होती. मात्र, सध्या अनेक ठिकाणी पार्सल स्वीकारले जात नसल्याने नागरिकांना पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. पार्सल वाहतुकीचे काम कंत्राटी पध्दतीने केले जाते. संबंधित कंत्राट संपल्यानतंर नवीन एजन्सी नियुक्त करण्यासाठी निविदाप्रकिया सुरु आहे.

एसटीचे जाळे ग्रामीण भागापर्यंत असल्याने छोटया गावांपर्यत पार्सल पोहोचविण्यासाठी ही सुविधा महत्वाची ठरते. सेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील डिलिव्हरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यापारी, छोटया व्यावसायिकांना फटका कपडे, किराणा, सुटे भाग, कागदपत्रेयांसह विविध वस्तू पाठविणाऱ्या व्यापाऱ्यांचा खर्च वाढत आहे. औषध वैद्यकीय साहित्य आणि इतर आवश्यक वस्तू पाठविण्यासाठी एसटीच्या पार्सल सेवेचा उपयोग केला जात होता. सेवा बंद असल्याने त्यासाठीचे पर्यायी वाहतूक शोधावी लागत आहे.

पार्सलसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी

एसटीची सेवा बंद असल्यामुळे खासगी कुरिअर आणि मालवाहतूक सेवांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे नुकसान होत असल्यामुळे लवकरात लवकर एसटीची पार्सल सेवा सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

पार्सल सेवा खासगी संस्थेमार्फत चालत असल्यामुळे ही सेवा कधी सुरु होईल सांगता येत नाही. मात्र, ही सेवा राज्य स्तरावरुनच बंद आहे.
वैशाली कांबळे आगारप्रमुख, वल्लभनगर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT