St Bus Pudhari File Photo
पिंपरी चिंचवड

ST Bus First Aid Box: एसटी बसमधील प्रथमोपचार पेट्या ‘शोभेच्या’; वल्लभनगर आगारातील सुविधांच्या अभावामुळे प्रवासी त्रस्त

१० पैकी ७ ते ८ बसेसमध्ये फर्स्ट एड बॉक्स गायब; चार्जिंग पॉइंट, वायफाय सुविधाही बंद असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये मोटार वाहन कायद्यानुसार प्रथमोपचार पेटी (फर्स्ट एड बॉक्स) असणे अनिवार्य आहे. त्यासह मोबाइल चार्जिंग पॉइंट, मोफत वायफाय, अग्निशमन यंत्र, अशा सुविधा एसटी महामंडळाच्या बसमध्ये असणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात एसटीमधील प्रथमोपचार पेटी फक्त शोभेसाठी असल्याचे समोर आले आहे. अनेकवेळा किरकोळ दुखापत झाल्यानतंर प्रथोमपचार पेटीमध्ये रुग्णोपयोगी साहित्य नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर आगारातून दररोज सुमारे सहा हजार प्रवासी ये-जा करतात. एस.टी. महामंडळाच्या १० पैकी तब्बल ७ ते ८ बसेसमध्ये प्रथोमपचार पेट्या गायब आहेत. तसेच, ज्या बसमध्ये पेट्या आहेत, त्या रिकाम्या किंवा धूळखात पडलेल्या अवस्थेत आहेत. मोटार वाहन कायद्यानुसार प्रथमोपचार पेटी (फर्स्ट एड बॉक्स) असणे अनिवार्य असून, प्रथोमपचार पेटीमध्ये तातडीच्या उपचारासाठी ॲन्टीसेप्टिक क्रीम, मलमपट्टी, (बॅंडेज), कापूस, डेटॉल, किंवा सॅव्हलॉन लिक्विड, चिकटपट्टी, पेनकिलर गोळया या सारख्या अत्यावश्यक वस्तू असणे गरजेचे आहे.

चार्जिंग पोर्टदेखील बंदच

जुन्या बसेसमध्ये चार्जिंग पोर्टची सुविधा नाही. तसेच, शिवशाही बसमधील चार्जिंग पोर्ट बंद अवस्थेत आहेत. शिवाई सारख्या बसेसमध्ये चार्जिंग पोर्टस बसविले आहे, परंतु तेदेखील नाददुरुस्त असल्याचे आढळून आले. त्यामुळे मोबाइल चार्जिंग करणे डोकेदुखी ठरत आहेत. या सुविधा प्रवाशांना न मिळाल्याल ते बस स्थानकावरील आगार व्यवस्थापकाकडे लेखी स्वरुपात तक्रार करु शकतात. याशिवाय एस.टी. मंहामंडळाच्या १८००२२१२५० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवता येते.

प्रवाशांचे म्हणणे काय

अनेकवेळा प्रवाशांना प्रवासादरम्यान उलट्या, मळमळ, तसेच तुटलेल्या बाकडामुळे किरकोळ इजा होणे असे समस्यांना सामोरे जावे लागते. एखाद्या वेळेत प्रवाशांचा हात खरचटल्यास बसमध्ये साधे बॅंडेजही उपलब्ध नसते. तसेच, एस. टी. महामंडळाने बसेसमध्ये मोफत वायफाय देण्याची घोषणा केली होती. मात्र, वल्लभनगर आगारातील एकही बसमध्ये वायफाय सेवा कार्यविन्त नसल्याचे प्रवाशांनी सांगितले.

आमच्याकडून वाहकाला सूचना दिल्या जातात. प्रथोमपचार पेटीची पाहणी करणे, वल्लभनगर आगारात येणाऱ्या बसेसची आमच्याकडून वारंवार पाहणी केली जाते. ज्या बसमध्ये प्रथमोपचार पेटी नाहीत, अशा बसची माहिती घेऊन ती त्वरित बसविण्यात येतील.
वैशाली कांबळे, स्थानक प्रमुख वल्लभनगर आगार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT