सोमाटणे: मावळ तालुक्यात विकासाची कोटींची कोटी कामं होत आहेत; पण या विकासाच्या गडगडाटात सामान्य माणसाचा जीव मात्र दिवसेंदिवस स्वस्त होत चालला आहे. सोमाटणे टोल आणि चौकात दररोज तासन्तास थांबणारी वाहनांची रांग आता नागरिकांच्या सहनशक्तीची नव्हे, तर जीवाच्या किंमतीची परीक्षा घेत आहे. अपघात वाढतात, मृत्यूंचे आकडे वाढतात, पण जबाबदारी स्वीकारायला मात्र कुणीही पुढे येत नसल्याचे दिसत आहे. मागील वर्षभरात तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमाटणे टोलनाका ते लिंब फाटादरम्यान झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा
टोल प्लाझावरची रांग नेहमीप्रमाणे काही मिनिटांची नाही, तर तासाभराहून अधिक ताटकळण्याची बनली आहे. रुग्णवाहिका अडकतात, ऑफिसला जाणारे अडकतात, विद्यार्थ्यांची बस अडकते. यातून कुणालाही सुटका नाही. टोलवरची गोंधळलेली व्यवस्था, अपुऱ्या लेन्स, टोल कर्मचाऱ्यांचा धीम्या गतीने होणारा व्यवहार आणि चौकातील वाहतूक नियंत्रणाचा पूर्ण अभाव यामुळे संपूर्ण परिसर मृत्यूचा अड्डा झाला आहे. दररोजचा अनुभव सांगतो, की दोन मिनिटं थांबा म्हणत सुरू झालेला प्रवास अचानक जीवघेण्या थरारात बदलतो.
अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
मावळात हजारो कोटींचे प्रकल्प, उद्योग, टाउनशिप उभे राहतात. पैसा येतो, प्रकल्प येतात, गुंतवणूक येते. पण जीव वाचवणारी पायाभूत सुविधा मात्र येत नाही. प्रशासनाने विकास दाखवण्यासाठी बोर्ड्स लावले, उद्घाटने केली, भाषणं केली. पण सोमाटणे टोलवरील गोंधळ, वाहतूककोंडी आणि अपघातांकडे मात्र कुणाचं लक्ष जात नाही.
मागील वर्षभरात तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमाटणे टोलनाका ते लिंब फाटा दरम्यान गंभीर अपघाताचे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. तर, 7 जण जखमी व 3 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. किरकोळ अपघातांमध्ये अनेक वाहनांचे नुकसानही झाले आहे.
मावळकरांचा जीव एवढा स्वस्त का?
तालुक्यात कोटींच्या कोटी प्रकल्प उभारले जात असून, यातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत आहे. मोठंमोठी कामे घोषित होतात; पण मावळातील सामान्य नागरिकांसाठी सुरक्षित रस्ता आणि शिस्तबद्ध वाहतूक मिळत नाही. नागरिक मरताहेत, अपघात वाढतात, वाहने तासन्तास थांबताहेत तरीही प्रशासनाचे कोणतेही नियोजन दिसत नाही. विकासाचा डंका वाजतोय पण त्याचवेळी मावळकरांच्या जीवाकडे कोणाचे लक्ष नाही. वाहनचालकांसह परिसरातील स्थानिक नागरिकांनी लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.