पिंपरी: इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या शुल्कात दुपटीहून अधिक वाढ केली आहे. मात्र, शासनाने शुल्कात वाढ करूनही परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचे उपलब्ध तीन वर्षातील आकडेवारीवरून समोर आले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेमार्फत दरवर्षी फेबुवारी महिन्यात इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृती परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला महापालिका, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित शाळांतील विद्यार्थी परीक्षा देतात. मराठी, इंग्लिश, हिंदी व उर्दू या चार माध्यमातून विद्यार्थी परीक्षा देतात. राज्य सरकारने तीन वर्षापूर्वी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पाचवी; तसेच आठवीच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्याऐवजी परीक्षा आणि प्रवेशशुल्कात एकूण अडीचपट वाढ केली आहे. या शुल्कवाढीमुळे शिष्यवृत्ती परीक्षा देण्याकडे कल नसणारे विद्यार्थी यापुढे परीक्षा देतील का, अशी परिस्थिती निर्माण झाली होती; परंतु प्रत्यक्षात विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसण्यास प्राधान्य दिले आहे.
या निर्णयानुसार बिगरमागास; तसेच मागास आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचे प्रवेशशुल्क 20 रुपयांवरून 50 रुपये केले आहे, तर बिगरमागास विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क 60 रुपयांवरून 150 रुपये केले आहे. यापूर्वी, मागास आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क आकारण्यात येत होते. मात्र, आतापासून 75 रुपये आकरण्यात येणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षांसाठी बिगरमागास विद्यार्थ्यांना एकूण 200 रुपये, तर मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांना 125 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
परीक्षेचा खर्च वाढल्याने शुल्कात वाढ
शालेय शिक्षण विभागाने 2010 सालानंतर शिष्यवृत्तीच्या रक्कमेत फारशी वाढ केली नाही. शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठी लागणाऱ्या प्रवेश आणि परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली. या शुल्कवाढीसाठी आवेदनपत्रे भरणे, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांची छपाई, उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग, निकाल तयार करणे, गुणवत्ता याद्या तयार करणे यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येतो. त्यामुळे या शुल्कात वाढ करण्यात येत असल्याचा दाखला शिक्षण विभागाने दिला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेच्या शुल्कात तीन वर्षापूर्वी वाढ केली आहे. मात्र शाळांचा सहभाग वाढल्यामुळे विद्यार्थिसंख्येत वाढ झाल्याचे पहायला मिळते.सुभाष सूर्यवंशी (शिष्यवृत्ती समन्वयक)