देहूगाव: हाती टाळ, गळ्यात मृदंग आणि मुखी विठ्ठल-विठ्ठल’, ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा नामघोष... असे वातावरण पालखी प्रस्थान सोहळ्या वेळी मंगळवार (दि. ७) देहूनगरीतील मुख्य मंदिरात होते. या पालखी सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक अभिनेत्यांनी सहभाग घेतल्याचे या वेळी दिसले. वारकरी, चोपदार, दिंडी, दिंडीप्रमुख यांच्या चेहऱ्यावर भक्तिभाव ओसंडून वाहत होता. देहूनगरीतील वातावरण भक्तिमय झाले होते.
पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर म्हणाल्या की, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त देहूमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त आम्ही तैनात केला आहे... जवळपास सातशे पोलिस कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन टीमही सोबतीला तैनात आहे.... पोलिस प्रशासनाकडून आम्ही वारकऱ्यांना आवाहन करत आहोत की, स्वतःची त्याचबरोबर सोबत असलेल्या लहान, वयोवृद्ध व्यक्तींची आपण काळजी घ्या... आणि वातावरणाचा आणि भक्तीचा आनंद घ्या.... जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. देहूनगरीमध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.
श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू विश्वस्त/ पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह मोरे म्हणाले की, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहूमधून प्रस्थान ठेवत आहे. या प्रस्थान सोहळ्यामुळे अवघी देहूनगरी आनंदात न्हाऊन निघाली आहे. गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे वारकऱ्यांना आम्ही पिंपरी-चिंचवड आणि पुण्यामधून पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे...
या आवाहनाला वारकरी मंडळींकडून तसेच भाविकभक्तांकडून प्रतिसाद मिळत आहे. पावसामुळे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी वारकऱ्यांची देहूमध्ये संख्या कमी आहे... यावर्षी नवीन चांदीचा रथ पालखी सोहळ्यामध्ये असणार आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या; तसेच श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात मराठी चित्रपट अभिनेत्री रिंकू राजगुरू व सिद्धेश लोकरेने सहभाग घेत फुगडीचा फेर धरला.