Water Supply Pudhari
पिंपरी चिंचवड

Sangvi Water Shortage: धरणे भरली तरी सांगवीकर तहानले; पाणीटंचाईमुळे नोकरदार महिलांचे हाल, पालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

एक दिवसाआड आणि कमी दाबाने पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त; गढूळ पाणी, जीर्ण जलवाहिन्या आणि ठेकेदारांच्या कारभारावर संताप

पुढारी वृत्तसेवा

सांगवी: सांगवी पाणीपुरवठा विभागाच्या अत्यंत ढिसाळ नियोजनामुळे सांगवीकरांचे जीवन विस्कळीत झाले आहे. पाणीकपातीच्या नावाखाली लादलेल्या या अकार्यक्षम पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे, विशेषतः नोकरदार महिलांचे प्रचंड हाल होत आहेत.

पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना बसत आहे. रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या आणि शिफ्टमध्ये काम करणाऱ्या या महिलांना पाणी भरण्यासाठी पहाटे पाच वाजता उठावे लागत आहे. अपुऱ्या झोपेमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, त्याचा थेट फटका त्यांच्या नोकरीवरही बसत आहे. सकाळी पाणी भरण्यात वेळ गेल्यामुळे ऑफिसच्या वेळेवर पोहोचणे कठीण होत आहे. घर सांभाळायचे की नोकरी करायची?, असा संतप्त सवाल या महिलांनी उपस्थित केला आहे.

​पाणीपुरवठा विभागाचा निष्काळजीपणा

पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्यांवर पालिकेचा एकही जबाबदार कर्मचारी उपस्थित नसून, सगळा कारभार ठेकेदारांच्या माणसांच्या हवाली असल्यामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचे बोलले जात आहे. अनेक वर्षांपूर्वीच्या जीर्ण पाइपलाइनमुळे नळातून दूषित आणि गढूळ पाणी येत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या मनमानी कारभारामुळे पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्याने नागरिकांना नळासमोर तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे.

धरणात मुबलक साठा, तरीही सांगवीकरांवर अन्याय

​ ​शहराला पाणी पुरवणारी धरणे ७० टक्क्यांहून अधिक भरलेली असतानाही सांगवीकरांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. इतर भागांत ९०० ते १००० चा फ्लो दिला जात असताना, सांगवीतील दोन्ही टाक्यांसाठी केवळ ३०० ते ४०० चा फ्लो का?, पिंपळे गुरवच्या जलवाहिनीवर पाणी वळवून सांगवीकरांच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारण्याचे हे षडयंत्र कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? धरणात पाणी असूनही सांगवीकरांना कोरड्या नळाची शिक्षा का दिली जात आहे, याचे उत्तर पाणीपुरवठा विभागाने द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सांगवीकरांच्या मागण्या

  • दररोज नियमित पाणीपुरवठा सुरू करावा

  • जीर्ण पाईपलाईन त्वरित बदलावी

  • पाणीपुरवठा विभागाच्या टाक्यांवर जबाबदार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून ठेकेदारांची मनमानी थांबवावी

  • कमी दाबाने येणारे पाणी बंद करावे

​पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे नियोजन म्हणजे पूर्णपणे फज्जा आहे. धरण ७० टक्के भरलेले असतानाही सांगवीकरांना एक दिवसाआड पाणी मिळते, हा अन्याय नाही का? टाक्यांवर अधिकारी नाहीत, ठेकेदारांची मनमानी आहे. जर प्रशासनाला सामान्य नागरिकांच्या आरोग्याची आणि त्रासाची पर्वा नसेल, तर आम्ही गप्प बसणार नाही.
सरिता देशमुख, स्थानिक रहिवासी
मी आयटीमध्ये काम करते. घरी येण्यास उशीर होतो. पाणी भरण्यासाठी पहाटे ५ वाजता उठण्याचे संकट असते. त्यातच गढूळ आणि अशुद्ध पाणी येत आहे. प्रशासनाने पाण्याचे वेळापत्रक रद्द करावे; अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.
मेधना शेणे, आयटी कर्मचारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT