पिंपरी : सांगवी फाटा येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले उड्डाणपूल अवघ्या आठ वर्षांतच खचला आहे. पुलास तडेही गेले असून, उड्डाण पुलाची सीमाभिंत कोसळण्याची शक्यता आहे. ही भिंत कोसळली तर, उड्डाण पुलाखालून ये-जा करणाऱ्या वाहनांचा अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
औंध ते रावेत बीआरटीएस रस्त्यावर सांगवी फाट्यावर औंध जिल्हा रुग्णालयाजवळ कोट्यवधी रुपये खर्चून पिंपरी-चिंचवड महापालिकेने उड्डाणपूल तसेच, ग्रेडसेपरेटर उभारला आहे. या उड्डाण पुलामुळे सांगवी फाट्यावर होणारी नित्याची वाहतूक कोंडी टळली आहे. सांगवी, पिंपळे गुरवकडून पिंपळे निलख, वाकड, पिंपळे सौदागर, हिंजवडी, वाकड, औंध, बाणेर, बालेवाडी, रावेत आदी भागात जाण्यासाठी वाहनचालक या पुलाचा सर्रास वापर करतात. वाहतुकीच्या दृष्टीने तो सोयीचाही आहे.
पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी
सांगवी, पिंपळे गुरव, दापोडीकडून औंध, बाणेर, हिंजवडीकडे जाण्यासाठी दुचाकीस्वार, वाहनचालक याच पुलाचा वापर करतात. महापालिका प्रशासनाने उड्डाण पुलाच्या सुरक्षिततेकडे सातत्याने लक्ष दिले पाहिजे. पूल खचून मोठा अपघात घडल्यावरच महापालिकेला जाग येणार आहे काय, महापालिकेने खचलेल्या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, असे सामाजिक कार्यकर्ते सुरेश सकट यांनी सांगितले.
प्रशासनाचे दुर्लक्ष
पुलाची निर्मिती झाल्यानंतर त्याचे महापालिकेकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ऑडिट होणे आवश्यक असते. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात जॉईंटवर पूल खचला असतानाही महापालिकेला याबाबत माहिती नसल्याचे समोर आले आहे. उड्डाण पुलांबाबतच्या अशा अनास्थेमुळे पूल पूर्णपणे खचून वाहनांना अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आठ वर्षांतच पुलाचे बांधकाम खचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.