Sangvi Encroachment Footpath Pudhari
पिंपरी चिंचवड

Sangvi Encroachment Footpath Issue: सांगवीत पदपथांवर अतिक्रमणाचा विळखा; नागरिकांचा जीव धोक्यात

नवी व जुनी सांगवी परिसरात फेरीवाले व दुकानदारांचे अतिक्रमण; महापालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

सांगवी: नवी सांगवी आणि जुनी सांगवी परिसरात सध्या पदपथावरून चालणेही मुश्कील झाले आहे. मुख्य रस्ते आणि पदपथावर अनधिकृत फेरिवाल्यांनी आणि दुकानदारांनी अक्षरशः कब्जा केला आहे. महापालिका प्रशासनाच्या ‌‘थातूरमातूर‌’ कारवाईमुळे या अतिक्रमणांना ऊत आला असून, रहिवाशांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत आहे. अक्षरश: सांगवीतील रस्त्यांचे पदपथच गायब झाल्याचे दिसून येत आहे.

सुरुवातीला केवळ पदपथावर आपले साहित्य मांडणारे हे दुकानदार आता थेट रस्त्यापर्यंत आले आहेत. पदपथ व्यापल्यानंतर आता रस्त्याचा अर्धा भाग हे दुकानदार आणि फेरीवाले गिळंकृत करत आहेत. यामुळे वाहतुकीची कोंडी तर होतेच, पण पादचाऱ्यांसाठी लाखो रुपये खर्च करून उभारलेले पदपथ पादचार्यांनाच वापरता येत नाहीत. हे वास्तव आहे. परंतु, याकडे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्य नागरिक मुकाट्याने रहदारीच्या रस्त्यावरून जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत.

प्रशासनाकडून कारवाईचा फार्स

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाकडून कोणी तक्रार केली की तेवढ्यापूर्ती कारवाई केली जात आहे. कारवाई करून पथक पुढे गेले की पुन्हा परिस्थिती जैसे थे होत आहे. अनेकदा कारवाई होणार आहे हे अगोदरच येथील व्यावसायिक व पथारीवाल्यांना समजत असल्याने बहुतांश व्यावसायिक त्यादिवशी हजर नसतात. नेमके असे का होते आणि प्रशासनाला खरंच येथील पदपथ अतिक्रमणमुक्त करायचे आहेत का, असा सवाल नागरिक करत आहेत. केवळ कारवाईचा फार्स न करता कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

चक्क रस्त्यातच थाटली दुकाने

नवी सांगवीत परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पदपथ तर आम्ही विसरूनच गेलो आहोत. आता चक्क रस्त्यावर दुकाने थाटली जात आहेत. महापालिका कारवाईसाठी येते, तेव्हा थोडा वेळ सामान हटवले जाते आणि कर्मचारी गेल्यानंतर लगेच पुन्हा दुकान थाटले जाते. प्रशासनाने फक्त दंडात्मक कारवाई न करता, यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे.

या मार्गांवर वाढले अतिक्रमण

  • बँक आॉफ महाराष्ट्र चौक

  • नवी सांगवी पाण्याची टाकी आणि बाजूचे रस्ते

  • बा. रा. घोलप बसस्थानक परिसर

  • माहेश्वरी चौक, एम.एस. काटे चौक आदी.

जुनी सांगवीच्या मुख्य रस्त्यांवरून चालताना आता भीती वाटते. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या गर्दीत आता फेरीवाल्यांनी अर्धा रस्ता व्यापला आहे. पालिका प्रशासनाचा या फेरीवाल्यांवर कोणताही अंकुश राहिलेला नाही. जर पालिका प्रशासन वेळीच जागे झाले नाही, तर या परिसरात मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मेघना देशपांडे, साई चौक, सांगवी.
स्थानिक नागरिकांनी सातत्याने प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु, पालिका प्रशासन मूग गिळून गप्प आहे, असा प्रश्न नागरिक करत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून या अनधिकृत अतिक्रमणांवर पालिका प्रशासन ठोस आणि कायमस्वरूपी कारवाई कधी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संदीप लंके, रहिवासी, जुनी सांगवी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT