पिंपरी: ममतानगर, सांगवी येथील मुळा नदी पुलावरील रोषणाई व सुशोभीकरण करण्याच्या कामात झालेल्या खर्चावरून विरोधक व सत्ताधारी आमनेसामने आले आहेत. या कामामध्ये अनियमितता झाली असल्याचा संशय विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केला आहे. त्यात 17 कोटी रुपयांचा वाढीव खर्च कागदावर दाखवण्यात आला असून, त्या कामाची चौकशी करण्याची मागणी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
याबाबत विरोधी पक्षनेते भोईर यांनी सांगितले की, सांगवी पुलावरील रोषणाई व सुशोभीकरण कामाच्या खर्चासंदर्भात स्थापत्य विभागाकडून माहिती मागविण्यात आली होती. प्राप्त माहितीनुसार, पुलाच्या रोषणाई व सुशोभीकरण कामामध्ये लोखंडी फ्रेम व इतर लोखंडी साहित्य वापरण्यात आले.
इतर खर्चाची बेरीज केली तर, 2 कोटी 27 लाख 50 हजार रुपये इतका खर्च झाला असेल. याशिवाय एलईडी लाईट, विद्युत साहित्य, केबलिंग, नियंत्रण यंत्रणा, रंगकाम, वाहतूक व इतर पूरक खर्च विचारात घेतला तरी संपूर्ण प्रकल्पाचा खर्च जास्तीत जास्त 5 कोटींपर्यंत अपेक्षित आहे.
मात्र, त्या कामावर तब्बल 22 कोटी रुपये खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे 17 कोटींच्या खर्चाबाबत शंका निर्माण झाली आहे. ती रक्कम नेमकी कोणत्या कामासाठी खर्च करण्यात आली, याचा तपशीलवार हिशोब सार्वजनिक करण्यात यावा. या कामात महापालिका निधीचा अपव्यय, आर्थिक अनियमितता झाली आहे.
त्यामुळे स्वतंत्र तांत्रिक समितीमार्फत प्रत्यक्ष मोजमाप व साहित्य पडताळणी करावी. स्वतंत्र आर्थिक लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात यावे. कामाचे अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका, बिल व मंजुरी आदेश यांची तपासणी करण्यात यावी. हे प्रकरण महापालिकेच्या सार्वजनिक निधीशी संबंधित असून, गंभीर स्वरूपाचे आहे. त्यामुळे तक्रारीस प्राधान्य देऊन तात्काळ चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी भोईर यांनी केली आहे.