पवन मावळात भातपीक जोमात Pudhari
पिंपरी चिंचवड

Pawan Maval Rice Crop: पवन मावळात भातपीक जोमात

पोषक वातावरणामुळे यंदा भातपीक जोमात आहे.

पुढारी वृत्तसेवा

पवनानगर: इंद्रायणी भातासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळ तालुक्याला निसर्गाचे वरदान आहे. भरपूर पाऊस आणि पोषक वातावरणामुळे येथील बहुतांश शेतकरी खरिपात भाताचे पीक घेतात. त्यामुळे मावळला भाताचे कोठार म्हटले जाते. यंदाही मावळात जवळपास साडेबारा हजार हेक्टर क्षेत्रावर भातलागवड करण्यात आली आहे. पोषक वातावरणामुळे यंदा भातपीक जोमात आहे.

मावळात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. यातही डोंगर माथ्यावर पावसाचा जोर अधिक असल्याने भात खाचरे भरून वाहत आहेत. त्यामुळे भातपिकांना दिलासा मिळत असून, भात पिके चांगलीच तरारली आहेत. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. (Latest Pimpri News)

पुणे जिल्ह्याचा विचार केल्यास मावळ तालुक्यासह मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर, आंबेगाव ही तालुके भात पिकांची तालुके म्हणून ओळखले जातात. या तालुक्यात अनेक शेतकरी विविध वाणाच्या भातलागवडी करतात. यंदाही अनेक शेतकर्‍यानी पारंपरिक पद्धतीने भाताची लागवड केली आहे. तर काही शेतकर्‍यांनी चारसूत्री पद्धतीने लागवडी केली आहे.

यंदा मे महिन्यापासून पाऊस सुरू आहे. परंतु, सततच्या पावसामुळे रोपवाटिका टाकण्यास अडचणी आल्या होत्या. जूनच्या अखेरीस पावसाने काहीशी उघडीप दिल्यानंतर रोपवाटिका टाकण्यात आल्या. त्यानंतर जुलैच्या दुसर्‍या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे भातलागवड वेळेवर झाली. ऑगस्ट महिन्यात पाऊस पडला. त्यामुळे भातपिकांना नवसंजीवनी मिळाली. यामुळे आता भातपिके चांगली तरारली आहेत.

ऑगस्टमधील पाऊस भातासाठी अमृत

ऑगस्टमध्ये भाताला आवश्यकतेनुसार पाऊस झाल्याने पीक जोमात आले आहे. हा पाऊस भातपिकासाठी अमृताचा शिडकावा करत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. यंदा भातलावणीस उशीर झाला होता. त्यानंतर सतत पडणार्‍या पावसामुळे भाताचे पीक पिवळे पडून त्याची वाढ मंदावली होती.

परिणामी, रोगराईचा धोका वाढल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, ऑगस्टच्या सुरुवातीपासून ऊन-पावसाचा समतोल निर्माण झाल्याने भाताची वाढ वेगाने सुरू झाली. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या हवामानामुळे भातावरील रोगाचा धोका टळला आहे. सध्या भातपीक चांगल्या स्थितीत असून, जून महिन्याच्या सुरुवातीस लावणी केलेल्या भाताची निसवणी पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT