पिंपरी : पिंपरी ते स्वारगेट या मार्गावर पिंपरी ते सिव्हिल कोर्ट दरम्यान मेट्रो 1 ऑगस्ट 2023 ला सुरू झाली. असे असले तरी, अद्याप रेंजहिल्स मेट्रो स्टेशन सुरू झालेले नाही. या स्टेशनचे काम महामेट्रोने नुकतेच सुरू केले आहे.
पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावर मेट्रो 6 मार्च 2022 सुरू झाली. नवीन मेट्रोचा आनंद घेण्यासाठी या मार्गास नागरिकांनी पसंती दिली. त्यानंतर 1 मे 2023 पासून पिंपरी ते पुण्यातील सिव्हिल कोर्ट या स्टेशन दरम्यान मेट्रो धावत आहे. त्यानंतर पिंपरी ते स्वारगेट 29 सप्टेंबर 2024 ला संपूर्ण मार्गावर मेट्रो धावत आहे. या मार्गास पिंपरी-चिंचवड शहरातून नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पिंपरी स्टेशन येथून विक्रमी संख्येने नागरिक दररोज मेट्रोने प्रवास करीत आहे. त्यामुळे महामेट्रोला मोठा महसूल मिळत आहे.
खडकी मेट्रो स्टेशनचेही काम कासव गतीने सुरू होते. ते स्टेशन 21 जून 2025 पासून नागरिकांसाठी खुले करण्यात आले.
असे असले तरी, अद्याप या मार्गावरील रेंजहिल्स स्टेशनचे काम पूर्ण झालेले नाही. त्या स्टेशनचे काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे रेंजहिल्स, रेंजहिल्स कॉर्नर, अशोकनगर तसेच, संरक्षण आस्थापनेतील कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. स्टेशनचे काम लवकरात लवकर पूर्ण करून स्टेशन प्रवाशांना खुले करण्याची मागणी केली जात आहे.