Rakhi Trends Pudhari
पिंपरी चिंचवड

Rakhi Trends: रक्षाबंधनसाठी शहरातील बाजारपेठा सजल्या; दरात दहा टक्क्यांनी वाढ

लहान मुलांसाठी स्पायडरमॅन, सुपरहिरो आणि कार्टून कॅरेक्टरच्या राख्या विक्रीस आल्या आहेत.

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: रक्षाबंधनाला आता अवघे काही दिवस उरले असल्यामुळे शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा रंगीबेरंगी राख्यांनी सजल्या आहेत. यंदा पारंपरिकसोबतच तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक राख्यांनी ग्राहकांना आकर्षित केले आहे.

बाजारात सर्वांत जास्त क्रेझ ब्रेसलेट स्टाईल राखी, नाव असलेल्या कस्टमाईज्ड राख्या आणि लाईट-म्युझिक असलेल्या राख्यांची आहे. लहान मुलांसाठी स्पायडरमॅन, सुपरहिरो आणि कार्टून कॅरेक्टरच्या राख्या विक्रीस आल्या आहेत.

मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रूंसाठी चांदीच्या आणि रुद्राक्ष-मोत्यांच्या राख्या उपलब्ध आहेत. या सोबत गिफ्ट कॉम्बो, चॉकलेट आणि शुभेच्छापत्रांनाही मोठी मागणी आहे.

लाईटिंग व म्युझिकल राखी

बच्चेकंपनीसाठी मिनीयन, मोटू पतलू, छोटा भीम, अँग्री बर्ड, बालगणेश, डोरेमॉन, शिनचॅन या कार्टून्सच्या राख्याही बाजारात आल्या आहेत. यामध्ये खासकरून लाईटिंग व म्युझिकल राखीही मिळते. लहानग्यांसाठी कार्टूनराखी उत्तम पर्याय आहे. तसेच, लहान मुलांना गिफ्ट देण्यासाठी कार्टून राखीसह त्या कार्टूनचे मास्क असा एक गिफ्टचा चांगला ऑप्शन आहे. यात मिनीयनला सर्वाधिक पसंती आहे.

लुम्बा राखीमध्ये बँगल प्रकार

मारवाडी किंवा गुजराती समाजात नणंद भावजईला 'लुम्बा राखी' बांधली जाते. या राखीमध्ये अनेक प्रकार उपलब्ध आहेत. आता केवळ फॅशन म्हणूनही याचा वापर केला जातो, त्यामुळे लुम्बालाही बाजारात मागणी वाढली आहे.

या राख्या खासकरून लटकन या प्रकारातील असतात. यात बांगडी पॅटर्नदेखील आहे. त्याला महिलांची चांगली मागणी आहे. यात मणी, क्रीस्टल यांचा सुरेखरित्या वापर केला जातो. तसेच, लोकरीचादेखील आकर्षकरित्या वापर केलेला पाहायला मिळतो.

राख्यांच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ

पिंपरी-चिंचवडच्या बाजारपेठांमध्ये राखी खरेदीला वेग आल्याचे दिसत आहे. बाजारपेठेत महिला राखी खरेदी करताना दिसत आहेत. पोस्टाने राख्या पाठविण्याची बहिणीची लगबग दिसून येत आहे. उद्योगनगरीमध्ये परप्रांतिय मोठ्या प्रमाणात असल्याने वेळेत राखी पाठविण्यासाठी आगाऊ खरेदी केली जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक मोठ्या आकारातील राख्यांसह लहान नाजूक आखीव रेखीव राख्यांना अधिक मागणी आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा अमेरिकन डायमंडसह, वुलन, लाकडी राखी, चांदीची, सोनेरी, थ्रेडवर्क अशा विविध राख्यांचे प्रकार पाहायला मिळत आहेत.

आपला प्रिय भाऊ जर बाहेरगावी राहात असेल तर त्याला देण्यासाठी राखीसह राखीचे ताट असा सेटही बाजारात विक्रीसाठी आहे. महागाईमुळे यंदा राख्यांच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारपेठेत दोन रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत वैविध्यपूर्ण राख्यांचे कलेक्शन आले आहे. आपल्याला हव्या त्या आकारात, रंगात असल्यामुळे खूप ऑप्शन आहेत.

बाहेरगावी पाठवण्यासाठी खास राखी पॅकेट

अनेक महिला आपल्या बाहेर गावी राहणाऱ्या लाडक्या भावाला पोस्टाने राखी पाठवतात. पोस्टाने राखी पाठवण्यासाठी खास सोय म्हणून आकर्षक ताटासह हळदीकुंकू, अक्षदा, राखी असा सेट सध्या बाजारात विकत मिळतोय. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर असा सेट तुमच्या भावाकरिता पाठवला तर वेळेत पोहोचेल यात शंका नाही. या सेटच्या किमतीत राखीनुसार विविधता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT