पिंपरी : मोहननगर, चिंचवड येथील महापालिकेच्या राजश्री शाहू महाराज जलतरण तलावाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे तलाव नागरिकांसाठी खुला करावा, अशा सूचना नगरसेवक प्रमोद कुटे, नगरसेविका वैशाली काळभोर, अरुणा लंगोटे यांनी क्रीडा विभागाचे अधिकारी, ठेकेदार व एजन्सीला दिल्या आहेत.
नगरसेवकांनी आज तलावाच्या कामाची पाहणी केली. या वेळी तलावाची दुरुस्ती, स्वच्छता, सुरक्षितता तसेच, पाणी शुद्धीकरण व्यवस्थेबाबत आढावा घेण्यात आला. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांना काम वेळेत व उत्कृष्ट दर्जात पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
उन्हाळा सुरू झाला असून, तातडीने तलाव नागरिकांसाठी खुला करावा, असे सांगण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांनी कामे अंतिम टप्प्यात असून, महिन्याभरात तलाव सुरू केला जाईल, अशी ग्वाही दिली आहे.