अविनाश दुधवडे
चाकण: पुणे-नाशिक, तळेगाव चाकण ते शिक्रापूर महामार्गावर सतत कित्येक वर्षे वाहतूक कोंडी होत आहे. यावर प्रशासनाने तात्पुरत्या उपाययोजना भरपूर केल्या. परंतु सर्वंकष विचार करून दीर्घकालीन उपाययोजना करण्यात ते कमी पडल्याने आता उपाय योजना सुरू केल्या तरी पायाभूत सुविधा निर्माण होण्यास प्रदीर्घ काळ जाणार आहे. महामार्गावरून सामान्य प्रवासी, नोकरदार यांना सकाळी कार्यालयात पोहोचताना आणि सायंकाळी या महामार्गाने प्रवास करताना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. महामार्गावरील वर्दळीच्या भागात वाहनांच्या रांगा प्रचंड लांबपर्यंत पोहचत असल्यामुळे दोन-दोन तास वाहतुकीची कोंडी सुटत असल्याची स्थिती निर्माण होत आहे. एवढी प्रचंड वाहतूक कोंडी का होते? हे पोलिसांसह प्रशासनालाच कळेना, अशी अवस्था निर्माण झाली आहे.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे आणि तळेगाव-चाकण ते शिक्रापूर महामार्गाचे काम तातडीने सुरू होईल, असे सांगण्यात येत असले, तरी मागील अनेक वर्षात हे काम सुरु होऊ शकलेले नाही. पुणे- नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते चांडोली अशा २९ किलोमीटर सहापदरीकरणाच्या कामाला मान्यता मिळाली आहे. त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया आणि मार्किंग करण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे.
याशिवाय औद्योगिक पट्ट्यातून जाणाऱ्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चार पदरी उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ५४ किलोमीटरच्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे अधिकारी सांगत आहेत. मात्र, प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. कारण मागील २५ वर्षे या भागातील महामार्गांची कामे घोषणांच्या पुढे सरकलेली नसल्याचा नागरिकांचा अनुभव आहे.
चाकणमधील समस्या बिकट
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे २९ किलोमीटरपर्यंत लांबीच्या नाशिक फाटा ते चांडोली (खेड) या रस्त्याच्या सहा पदरीकरणाचे घोषणांच्या पुढे सरकत नसलेले काम, वाहनांची वाढलेली संख्या, अवैध प्रवासी वाहतुकीच्या जीप, सहाआसनी रिक्षांची वाढलेली वर्दळ, वाहतूक विभागाचे दुर्लक्ष, बेशिस्त वाहनचालक आणि शहरातील अरुंद चौकांची कोंडी अशा विविध कारणांमुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागत आहे. चाकणसारख्या भागात ही समस्या तुलनेने मोठ्या प्रमाणावर भेडसावत असून, पादचारी, दुचाकीस्वार आणि मोटारचालकांना पुणे नाशिक महामार्गावरील विविध चौक ओलांडणे अक्षरशः जिकिरीचे होऊन बसले आहे.
पुणे-खेड उन्नत मार्ग; कुणामुळे रखडला?
पुणे ते नाशिक प्रवास वेगवान करण्यासाठी नाशिक फाटा ते खेड हा ३० किलोमीटरचा उन्नत महामार्ग प्रस्तावित आहे. या सुमारे ७ हजार ८२७ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑगस्ट २०२४ मध्ये मंजुरी दिली. मात्र, या प्रकल्पाला राज्य सरकारमुळेच मागील काही काळात खो मिळाल्याची बाब समोर आली होती. यामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निविदा प्रक्रिया राबवूनही या प्रकल्पाचे काम सुरू करता येत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याप्रकरणी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पुण्यातील कार्यक्रमात नाराजी व्यक्त करीत सरकारी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर आता भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या रस्त्यामुळे भविष्यात पुणे-नाशिक महामार्गावरील दळणवळणाचा ताण कमी होऊन येथील वाहतूक व्यवस्था सक्षम होणार आहे. मात्र, सहापदरीकरणाचे काम जलदगतीने करण्याची नागरिकांची मागणी आहे.