Mobility Hub Pudhari
पिंपरी चिंचवड

Pune Mobility Hub: २०३० पर्यंत पुणे देशातील महत्त्वाचे मोबिलिटी हब बनणार; मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास

मेट्रो, इलेक्ट्रिक बस, रिंगरोड, बोगदे आणि विमानतळामुळे आधुनिक वाहतूक सुविधांचे जाळे; हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोमुळे आयटीयन्सना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरए) अशा सर्व परिसरात मेट्रो, इलेक्ट्रिक बस, इनर रिंगरोड, आउटर रिंगरोड, बोगदे व नव्या विमानतळासह आधुनिक वाहतूक सुविधांचे जाळे उभारण्यात येत आहे. या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून सन 2030 पर्यंत हा परिसर देशातील महत्त्वाचे मोबिलिटी केंद्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणेरी मेट्रो मार्गिका टप्पा तीनचे उद्घाटन व पुणे मेट्रो टप्पा दोनमधील विस्तारीत चार नव्या मार्गाचे भूमिपूजन सोहळा मंगळवार (दि. ३) म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे झाला. त्या सोहळ्यात ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुणे महानगर प्रदेशाला मोठे शहरी विकास केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने 5 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीच्या माध्यमातून पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरए परिसरात आधुनिक वाहतूक व्यवस्था विकसित करण्याचे नियोजन आहे. पुणे मेट्रो ही ग्रीन मेट्रो म्हणून विकसित होत असून आवश्यक ऊर्जेपैकी 30 टक्के ऊर्जा स्वतः निर्माण करणार आहे. पुणे परिसरात मेट्रो, इलेक्ट्रिक बसेस, इनर व आउटर रिंगरोड, सीएमटीआर, भूमिगत मार्ग आणि बोगद्यांचे जाळे विकसित होत आहे. यामुळे पुणे केवळ आयटी व उत्पादन क्षेत्राचेच नव्हे, तर फ्रंटियर टेक्नॉलॉजीचेही महत्त्वाचे केंद्र बनेल. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यात पुण्याचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले की, पुणे शहरात सुमारे 120 किलोमीटरचे मेट्रो मार्ग तयार झाले असून, काही मार्गांची कामे सुरू आहेत. देशातील मेट्रो विस्ताराचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला झाला आहे. राज्यातील 12 महापालिका हद्दीत मेट्रो सुरू असून, कामेही कामे सुरू आहेत. मेट्रो ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून आर्थिक विकासाला चालना देणारी यंत्रणा आहे. मेट्रोमुळे गुंतवणूक, रोजगार व त्याभोवतीचे आर्थिक परिसंस्थेचे जाळे विकसित होते.

आयटीयन्सची वाहतूक कोंडीतून सुटका होणार

हिंजवडी परिसर हा देशातील महत्त्वाचा आयटी हब आहे. या परिसरात दररोज हजारो अभियंते कामासाठी येतात. वाहतूक कोंडीमुळे त्यांना अनेकदा एक ते दोन तास अडकून पडावे लागते. मेट्रो सुरू झाल्यामुळे आयटी क्षेत्रातील कर्मचारी, विशेषतः तरुण-तरुणींना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन सन 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यांच्याच हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होत असल्याचा आनंद होत आहे, असे ते म्हणाले.

पिंक पॉवर्ड मेट्रो

देशात पीपीपी तत्त्वावर उभारण्यात आलेला शिवाजीनगर-हिंजवडी हा पहिला प्रकल्प आहे. टाटा समूह व सीमेन्स कंपनी यांनी या प्रकल्पाची उभारणी केली. केंद्र व राज्य सरकारचे सहकार्य, व्यवहार्यता तफावत निधी व महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलेले जमीन संपादन यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास आला. या प्रकल्पाच्या उभारणीपासून संचालनापर्यंत महिलांचे योगदान सर्वाधिक आहे. पिंक पॉवर्ड मेट्रो महिला शक्तीच्या सहभागाचे प्रतीक आहे.

‘मेट्रोमुळे शहराच्या विकासाला सुपरफास्ट गती’

पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित व आरामदायी करण्यामध्ये मेट्रो महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मेट्रो तीन हा पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला कलाटणी देणारा प्रकल्प असून, पुण्याच्या भविष्याला नवा आकार देणारा व नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीच्या समस्या कमी करणारा ठरेल. पुणे-मुंबई एक्सप्रेस वे मार्गामुळे पुण्याच्या विकासाला चालना मिळाली असून, मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी झाला आहे. पुण्याभोवती रिंगरोड विकसित करण्यात येत आहे. या सर्व प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन पुणेकरांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

'सावित्रीच्या लेकी मेट्रोचे सारथ्य करणार ही अभिमानास्पद बाब'

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्टेशन आहे. पुणे शहर हे सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्याच पुण्यात आता या मेट्रोचे सारथ्य महिला करणार आहेत. तसेच, या मार्गावरील सर्व कर्मचार्‍यांमध्ये 50 टक्के महिला आहेत. ही ऐतिहासिक तसेच, अभिमानाची बाब आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या.

अजितदादांच्या कामांचे कौतुक

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प मुदतीमध्ये पूर्ण होण्यासाठी अजितदादांनी खूपच लक्ष घातले होते. मेट्रोच्या प्रत्येक डीपीआर निर्मितीपासून मंजुरीपर्यंत अजितदादांचे मोलाचे योगदान राहिले आहे. अर्थमंत्री म्हणून त्यांनी प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला. हिंजवडीतील मेट्रो स्टेशनची पाहणी करून कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मेट्रो तसेच, शहरासाठी असलेले त्यांचे योगदान कोणी विसरू शकणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या कार्याचे कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT