Pune Metro  Pudhari
पिंपरी चिंचवड

Pune Metro Solar Engery Project: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पात सौरऊर्जा वापर; दरवर्षी 20 कोटींची बचत

आधुनिक थर्ड रेल सिस्टीममुळे वार्षिक वीज खर्चात मोठी बचत होणार

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणेरी मेट्रो प्रकल्पात पर्यावरणपूरक आणि ऊर्जा बचतीवर आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे. सौर ऊर्जा आणि थर्ड रेल सिस्टीमच्या वापरामुळे मेट्रोच्या वार्षिक वीज खर्चात सुमारे 20 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

या मार्गावरील सर्व 23 उन्नत स्थानकांवर तसेच कार डेपोच्या छतांवर सौर ऊर्जा पॅनेल्स बसवण्यात येत आहेत. एकूण 11 मेगावॉटपेक्षा अधिक क्षमतेचे सोलर प्लांट उभारले जात असून, त्यातून निर्माण होणारी वीज स्थानकांवरील दिवे, लिफ्ट, एस्कलेटर आणि वातानुकूलित यंत्रणांसाठी वापरली जाणार आहे. ही यंत्रणा मुख्य वीज ग्रीडशी जोडण्यात येणार असल्याने विजेचा कार्यक्षम वापर शक्य होणार आहे.

हा प्रकल्प रेस्को मॉडेलवर राबवण्यात येत असल्याने पीएमआरडीएला प्रारंभी कोणताही भांडवली खर्च करावा लागलेला नाही. खासगी कंपनीने स्व:खर्चाने सौर यंत्रणा उभारून तिची देखभालही स्वीकारली आहे.

मेट्रोच्या डब्यांची निर्मिती हलक्या ॲल्युमिनियम धातूपासून करण्यात आली असून, त्यामध्ये री-जनरेटिव्ह ब्रेकिंग तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यामुळे ब्रेक लावताना निर्माण होणारी अतिरिक्त वीज पुन्हा वापरता येणार आहे.

याशिवाय, शहराचे सौंदर्य टिकवण्यासाठी ओव्हरहेड तारांऐवजी आधुनिक थर्ड रेल सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. 750 व्होल्ट डीसी वीजप्रवाह असलेल्या या प्रणालीद्वारे मेट्रो गाड्यांना थेट वीजपुरवठा केला जाणार असून, ही यंत्रणा सुरक्षित आणि कार्यक्षम मानली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT