पिंपरी: अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली माण-हिंजवडी-शिवाजीनगर-डिस्ट्रिक्ट कोर्ट या २३.२०३ किलोमीटर अंतराच्या उन्नत मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवार (दि. ३) सकाळी दहा वाजता ऑनलाईनद्वारे होणार आहे. तर, नागरिकांच्या सेवेत मेट्रो बुधवार (दि. ४) पासून दररोज सकाळी सहा ते रात्री ११.४० अशी धावणार आहे. त्यामुळे हिंजवडी आयटी पार्कमधील अभियंत्यांची सततच्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून, त्यांना दिवाळीचे गिफ्ट मिळणार आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि टाटा-सीमेन्स कंपनीच्या वतीने पीपीपी तत्त्वावर तयार करण्यात आलेल्या या ८ हजार ३१३ कोटी रुपये खर्चाच्या पुणेरी मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनाचा मुहूर्त दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने निश्चित झाला आहे. हा संपूर्ण २३ किलोमीटर अंतराचा प्रकल्प एकाच वेळी मंगळवारी सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात २३ पैकी १७ मेट्रो स्टेशनवर मेट्रो थांबणार आहे. तर, लक्ष्मीनगर आणि बालेवाडी फाटा हे दोन मेट्रो स्टेशन नोव्हेंबर २०२६ ला सुरू करण्याचे नियोजन आहे. उर्वरित स्टेशन टप्प्याटप्प्याने खुले करण्यात येणार आहेत.
यासंदर्भात माहिती देताना पीएमआरडीएचे आयुक्त अभिजित चौधरी यांनी सांगितले की, या मेट्रो मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे. यानिमित्त म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे. सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री व प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मार्गावरील प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन पादचारी पुलाने जोडण्यात आला आहे. त्या स्टेशनवरून प्रवाशांना मेट्रो बदलून पिंपरी, स्वारगेट, वनाज, रामवाडी दिशेच्या मेट्रो मार्गातून प्रवास करता येणार आहे. सध्या पुणेरी मेट्रो व महामेट्रोच्या मार्गावर वेगवेगळे तिकीट काढावे लागणार आहे. लवकरच पुणे वन नावाने एकत्रित तिकीट प्रणाली सुरू करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.
असे काढता येईल तिकीट
पुणेरी मेट्रोचे तिकीट काढण्यासाठी एक कार्ड आहे. तसेच, महामेट्रोच्या पुणे मेट्रो कार्डनेही तिकीट काढता येणार आहे. तसेच, क्यूआरकोडने, व्हॉटस अॅपद्वारेही तिकीट काढता येणार आहे. स्टेशनवर तिकीट काउंटरवर तिकीट काढून दिले जाईल. तसेच, व्हेंडिग मशीनद्वारेही तिकीट काढता येणार आहे. सध्या महामेट्रो आणि पुणेरी मेट्रोची तिकीट प्रणाली स्वतंत्र आहे. लवकरच ‘पुणे वन’ नावाने एकत्रित तिकीट प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. महामेट्रोने स्वत: निधी उभारला असल्याने तसेच, त्यांच्या प्रकल्पाचे अंतर १५ किलोमीटरपेक्षा अधिक नाही. त्यामुळे त्यांचे तिकीट दर कमी वाटतात, असे टाटा सीमेन्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सेनी यांनी सांगितले.
टाटा सीमेन्स कंपनी करणार मेट्रोचे ३२ वर्षे संचालन
हा प्रकल्प टाटा सीमेन्स कंपनीने उभारला आहे. त्याबाबत पीएमआरडीए आणि त्या कंपनीसोबत ३५ वर्षांचा करारनामा करण्यात आला आहे. प्रकल्प उभारणीस ३ वर्षांचा कालावधी आहे. तर, मेट्रोचे संचालन टाटा सीमेन्स कंपनी ३२ वर्षे करणार आहे. फ्रान्स येथील कंपनी मेट्रोचे संचालन करणार आहे. ती कंपनी हैदराबाद येथील मेट्रोचे संचालन करत आहे. कंपनीचे स्वत:चे ६०० मनुष्यबळ आहे. तर, कंत्राटी ६०० मनुष्यबळ नेमले जाणार आहे. मेट्रोचे संचालन केवळ महिला चालक करणार आहेत. त्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहेत. मात्र, या प्रकल्पासाठी सुरक्षा यंत्रणा पीएमआरडीएची असणार आहे. त्याचा खर्च पीएमआरडीए करणार आहे.
जागा ताब्यात घेण्यास विलंब झाल्याने प्रकल्पास उशीर झाल्याचा दावा
या प्रकल्पासाठी जागा ताब्यात येणास विलंब झाल्याने प्रत्यक्ष काम सुरू करण्यास विलंब झाला. कोरोना महामारीमुळे जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया लांबली. प्रत्यक्षात २५ नोव्हेंबर २०२१ ला काम सुरू झाले. प्रचंड वाहतूक रहदारी व कोंडी (विशेषत : गणेश खिंड आणि हिंजवडी) वेगवेगळ्या सेवा वाहिन्यांचे स्थलांतरण करणे आदींमुळे काम करण्यास अधिक वेळ गेला. असे असूनही एकही दुर्घटना न होता, सुरक्षितपणे प्रकल्पाचे काम केवळ चार वर्षांत पूर्ण करण्यात आले आहे, असा दावा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
सकाळी सहा ते रात्री ११.४० वेळेत मेट्रो धावणार
वर्दळीच्या वेळेत महामेट्रोकडून दर पाच मिनिटाला एक मेट्रो सोडली जाते. महामेट्रोच्या वेळापत्रकासोबत नियोजन करून पुणेरी मेट्रो प्रत्येक सहा मिनिटाला धावणार आहे. त्यामुळे या दोन्ही मेट्रो एकमेकांशी जोडल्या जातील. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित व वेगवान मेट्रोतून प्रवाशांचा आनंद घेता येईल. मेट्रो सकाळी सहाला सुरू होणार आहे. तर, सिव्हिल कोर्ट येथून शेवटची मेट्रो रात्री ११.४० सुटणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महामेट्रोपेक्षा तिकिटाचे दर अधिक
महामेट्रोच्या पुणे मेट्रोपेक्षा पुणेरी मेट्रोचे दर अधिक आहेत. पहिल्या दोन किलोमीटर अंतरासाठी १२ रुपये तिकीट आहे. चार किलोमीटरसाठी २५ रुपये, आठ किलोमीटरासाठी ३७ रुपये, १२ किलोमीटरसाठी ४३ रुपये, १८ किलोमीटरसाठी ४९ रुपये आणि १८ किलोमीटरपेक्षा अधिक अंतरासाठी ६२ रुपये तिकीट आहे. किमान १२ रुपये आणि कमाल ६२ रुपये तिकीट आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून दरवर्षी तिकीट दरात वाढ करण्यात येणार आहे.
८० टक्के झाडे वाचल्याचा दावा
मेट्रो मार्गिका तयार करताना अडथळा ठरणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. त्यातील तब्बल ८० टक्के झाडे जगली आहे. तर, एका झाडामागे पाच मोठी झाडे लावण्यात आली आहेत. प्रकल्प उभारताना पर्यावरण संवर्धनाकडे प्राधान्याने लक्ष दिले गेल्याचा अधिकाऱ्यांनी सांगितले.
दररोज दोन ते अडीच लाख प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल
या मेट्रो मार्गासाठी लोहमार्गातून वीजपुरवठा केला जाणार आहे, अशा प्रकारे धावणारी ही भारतातील पहिली मेट्रो आहे. त्यामुळे मार्गिकेच्या वरील बाजूने विजेचे खांब नसणार आहेत. तसेच, मेट्रोचे कोच हे पूर्णत: भारतीय बनावटीचे आहेत. सौर ऊर्जेतून ३० टक्के वीज तयार होणार आहे. ते स्टेशनवर वापरण्यात येणार आहे. या मेट्रो मार्गाबाबत हिंजवडी आयटी भागात मोठी उत्सुकता आहे. या माण ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावर पहिल्या दिवसापासूनच दररोज दोन ते अडीच लाख प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल. त्यात भविष्यात आणखी वाढ होईल, असा दावा पीएमआरडीएचे आयुक्त अभिजित चौधरी यांनी केला आहे.
मेट्रो प्रवाशांसाठी फिडर सेवा
मेट्रो प्रवाशांसाठी स्टेशन येथे फिडर सेवेची सोय करण्यात येणार आहे. त्यासाठी पीएमपीएलचे २० बस नेमण्यात आले आहेत; तसेच रिक्षा असणार आहेत. हिंजवडी आयटी भागात खासगी बस नेमण्यात आले आहेत. फिडर सेवेचे भाडेदर माफकच असणार आहे, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
स्टेशनचे नाव बदलणार नसल्याचा दावा
या प्रकल्पातील सर्व मेट्रो स्टेशन नाव आहे तेच राहणार आहे. राज्य सरकारच्या समितीमार्फत ती नावे निश्चित करण्यात आली आहेत. स्टेशनला पुरस्कर्ता मिळाल्यास स्टेशनच्या नावासह ते नाव जोडले जाणार आहे. आत्तापर्यंत असे ९ पुरस्कर्ते मिळाले आहेत. स्टेशनवर ब्रँण्डिंग व जाहिरातीच्या माध्यमातून कंपनी उत्पन्न मिळणार आहे. तसा करारनामा करण्यात आला आहे.
पार्किंगची सुविधा नाही
संपूर्ण २३ किलोमीटर अंतराच्या मेट्रो स्टेशनवर प्रवाशांसाठी पार्किंगची सुविधा करण्यात आलेली नाही. प्रवाशांनी फिडर सेवेचा लाभ घेत मेट्रो स्टेशनवर ये-जा करावी. स्वत:च्या खासगी वाहनांचा कमीत कमी वापर करावा, हा मेट्रो प्रकल्पाचा हेतू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणेरी मेट्रोचे वैशिष्ट्ये
एकूण अंतर : 23.203 किलोमीटर
मेट्रो स्टेशन : 23
नंतर सुरू होणारे सहा स्टेशन : लक्ष्मी नगर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर, आरबीआय, शिवाजी नगर, 13,14,15,16,20,22
कामास सुरूवात :25 नोव्हेंबर 2021
उद्घाटन : 3 नोव्हेंबर 2026
एकूण खर्च : 8 हजार 313 कोटी रुपये
प्रकल्प : पीपीपी तत्वावर (देशातील पहिला)
कराराचा कालावधी-35 वर्षे
संचालन-टाटा समूह व सीमेन्सची पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडमार्फत
केवळ सुरक्षा व्यवस्था : पीएमआरडीएकडून
सर्वात जास्त अंतराचा पुणे-पिंपरी-चिंचवड शहरातील पहिला प्रकल्प
पुणे-पिंपरी-चिंचवड शहरातील तिसरा मेट्रो मार्ग
मेट्रोला वीजपुरवठा-रुळातून
मेट्रो कोचची बनावट-भारतीय
मेट्रो कोच-22
प्रवासी क्षमता-1 हजार
फेर्या- दर सहा मिनिटास
वेळ : सकाळी 6 ते रात्री 11.40