Pune Metro  Pudhari
पिंपरी चिंचवड

Pune Metro Ganesh Festival: गणेशोत्सवात पुणे मेट्रोचा विक्रम; ४४ लाखांहून अधिक प्रवाशांचा प्रवास

उत्सवादरम्यान महामेट्रोला ३.७९ कोटींचे उत्पन्न; अनंत चतुर्दशीला गर्दीचे नियोजन करत ४१ तास मेट्रोसेवा

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: यंदाच्या गणेशोत्सवात मेट्रोच्या प्रवासी संख्येने उच्चांक प्रस्थापित केला असून, संपूर्ण उत्सवादरम्यान ४४ लाख सात हजारांहून अधिक प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. महामेट्रोला या काळात ३ कोटी ७९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

गेल्या वर्षी मेट्रोतून ३५ लाखांहून अधिक प्रवाशांनी पूर्ण गणेशोत्सवादरम्यान, तर ५ लाख ९० हजार प्रवशांनी फक्त विसर्जनाच्या दिवशी प्रवासासाठी मेट्रोला पसंती दिली. २०२४ मध्ये उत्सवात २० लाखाहूंन अधिक, तर विसर्जनाच्या दिवशी सुमारे साडेतीन लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला.

मध्यवर्ती पेठांमधील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद होते. त्यात पर्यायी मार्गांवर वाहतूक कोंडी होते. तरीही स्वारगेट, मंडई, कसबा या मेट्रो स्थानकांवरुन मध्यवर्ती पेठांमध्ये गणेशदर्शनासाठी प्रवास करणे सहज शक्य असल्याने प्रवाशांकडून मेट्रोच्या पर्यायाला पसंती देण्यात आली. यंदा गणेशोत्सवात शनिवार- रविवारी मध्यवर्ती पेठांमध्ये गणेशदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी होती. त्यामुळे शनिवार- रविवारीही मेट्रोच्या प्रवाशांनी उच्चांक गाठला.

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर नियोजन कडक

गणेशोत्सवातील गर्दी लक्षात घेऊन मेट्रो प्रशासनाने प्रमुख स्थानकांवर प्रवाशांच्या आगमन-निर्गमनचे नियोजन केले होते. विशेषत: मध्यवर्ती भागातील महात्मा फुले मंडई, स्वारगेट आणि पीसीएमसी या स्थानकांवर मोठ्या संख्येने प्रवाशांची ये- जा झाली. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मेट्रो प्रशासनाने गर्दीचे नियोजन केले होते. काही प्रमुख स्थानकांवरील प्रवेश आणि निर्गमनाची गेटनिहाय व्यवस्था बदलण्यात आली असून, तसेच प्रवाशांची गर्दी एका ठिकाणी होऊ नये, यासाठी प्रवेश आणि निर्गमनासाठी स्वतंत्र मार्ग निश्चित केले होते. महात्मा फुले मंडई स्थानकातही गर्दीच्या पार्श्वभूमीवर बॅरिकडिंग केले होते. वाढती गर्दी लक्षात घेऊन मेट्रोसेवा सलग ४१ तास सुरू ठेवण्याचे नियोजन केले.

गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन चोख नियोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड शहरातील मोठ्या संख्येने प्रवासी पुणे शहरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी दाखल होतात.
चंद्रशेखर तांबवेकर , जनसंपर्क अधिकारी महामेट्रो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT