पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कचर्याचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेकडून सातत्याने जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. दररोज 100 किलो किंवा त्याहून अधिक कचरा निर्माण होतो, अशा हाऊसिंग सोसायट्यांना महापालिकेकडून मालकत्ताकरात सवलत दिली जाते.
ओला व सुका कचरा विलगीकरण, होम कम्पोस्टिंग, शून्य कचरा प्रकल्प, तसेच वस्तूंच्या पुनर्वापरासाठी आरआरआर केंद्रे या उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये स्वच्छतेची सवय रुजविण्याचा प्रयत्न सुरू आहे. महापालिकेकडून अशा पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या हाऊसिंंग सोसायटी, आस्थापने, हॉटेल व्यवसायिक आणि इतर मालमत्ताधारकांना प्रोत्साहन देण्यासाठी मालमत्ता कर भरताना सामान्यकरात सवलत देण्यात येते. अनेक हाऊसिंग सोसायट्या, शाळा, आस्थापने आणि उद्योगसंस्था कचरा व्यवस्थापनाच्या दिशेने पुढाकार घेत आहेत. यामुळे शहरातील कचरा संकलनावरील ताण कमी होत आहे. .
शहरातील कचरा व्यवस्थापनात नागरिक व हाऊसिंग सोसायट्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. स्वतःच्या परिसरात कचर्याचे कम्पोस्टिंग करणाऱ्या सोसायट्या या शहराच्या स्वच्छतेच्या खऱ्या भागीदार आहेत. महापालिकेकडून अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. मालकत्ताकरातील सामान्यकरातील सवलतीचा लाभ सोसायट्यांनी घ्यावा, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.