पिंपरी: जपान येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत धनुर्विद्या स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक विजेती प्रिथिका प्रदीप ही पिंपरीतील अजमेरा कॉलनीत राहावयास आहे. इयत्ता पाचवीमध्ये असल्यापासूनच धनुर्विद्या खेळास सुरुवात केल्याचे प्रिथिका सांगते. सध्या ती पिंपळे गुरव येथील धनुर्विद्या केंद्रात प्रशिक्षक कुणाल टावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. प्रशिक्षक तसेच आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे हे यश आपल्याला मिळाल्याचे प्रिथिकाने सांगितले. आई प्रिया या शिक्षिका असून, वडील प्रदीप हे एका कंपनीत उपमहाव्यवस्थापक आहेत. लहान भाऊ प्रणित नववीत शिकत आहे.
दररोज नऊ तास कठोर सरावाचे फळ
प्रिथिका धनुर्विद्याचा कठोर सराव करते. या खेळातील कंपाऊंड या प्रकाराचा धनुष्यबाण ती वापरते. त्यात धनुष्यबाणाला व्हील्स असतात. सकाळी पाच तास आणि संध्याकाळी चार तास अशी ती सरावासाठी मेहनत घेते. या खेळात मेडिटेशन व दृश्यमानता हा महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी साधारण अर्धा तास स्वतंत्र सराव केला जातो. शारीरिक तंदुरुस्तीसाठीही विशेष लक्ष दिले जाते. आशियाई स्पर्धेसाठी सोनिपत येथील दोन महिन्यांच्या विशेष सराव शिबिरात तिने प्रचंड मेहनत घेतली.
अनेक आंतरराष्ट्रीय पदकांची मानकरी
कमी वयात आंतरराष्ट्रीय पदके जिंकणारी ती खेळाडू आहे. यापूर्वी तिने कॅनडा येथे झालेल्या जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे. जपान येथे झालेल्या आशियाई कॅडेट अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. स्पेन येथील जागतिक चषक स्पर्धेत तिने दोन सुवर्णपदक व 1 कांस्यपदक जिंकले होते. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिने एक सुवर्णपदक व एक रौप्यपदक मिळवले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत तिची पहिल्यांदा निवड झाली होती. या स्पर्धेत तिने सांघिक सुवर्णपदक जिंकले. वैयक्तिक प्रकारात तिला यश मिळाले नाही. सन 2028 होणार्या ऑलिंपिक स्पर्धेत कंपाऊंड धनुर्विद्या क्रीडा प्रकाराचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे. त्यातही ती सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील आहे.
पिंपरी-चिंचवड संघटनेला पहिलेच आशियाई पदक
पिंपरी-चिंचवड आर्चरी असोसिएशनला प्रिथिकाच्या रुपात पहिलेच आशियाई सुवर्णपदक मिळाले आहे. संघटनेची आशियाई स्पर्धेत खेळणारी ती पहिलीच खेळाडू आहे. देशात प्रथम तीनमध्ये असल्याने तिची आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत संघटनेच्या खेळाडूंनी सहभाग घेत पदके जिंकली आहेत. प्रिथिकाच्या यशामुळे पिंपरी-चिंचवड शहरात धनुर्विद्या खेळास चालना मिळेल. अनेक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी या खेळाकडे आकर्षित होतील. शहरात या ठिकाणी धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र आहेत, असे पिंपरी-चिंचवड आर्चरी असोसिएशन सचिव व आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक सोनल बुंदेले यांनी सांगितले.
जागतिक स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकण्याचा इरादा
धनुर्विद्या प्रकारात आशियाई सुवर्णपदक जिंकल्याने आत्मविश्वास वाढला आहे. जोमाने सराव करून, लवकरच होणार्या जागतिक युवा स्पर्धेची तयारीचा दबाव आहे. तेथेही भारत देशासाठी पदक जिंकण्याचे ध्येय आहे. त्यादृष्टीने माझी पुढील वाटचाल राहणार आहे. या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहराचा नावलौकीक जागतिक पातळीवर नेण्याचा माझा प्रयत्न आहे, असे आशियाई सुवर्णपदक विजेती प्रिथिका प्रदीप हिने सांगितले. प्रिथिकाचे पहिले ते दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण चिंचवड येथील एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले. तिचे अकरावी व बारावी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण जी. जी. इंटरनॅशलन स्कूल येथे झाले. आता ती पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात कला शाखेच्या प्रथम वर्षात शिकत आहे.