

उर्से मावळ: पावसाळा संपत आला तरी तालुक्यात अपुऱ्या पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. सलग दीड महिन्यापासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील खरीप हंगामातील पिके अक्षरशः हातातून गेली आहेत. परिणामी, बळीराजा पुन्हा एकदा तीव्र आर्थिक संकटात सापडला आहे.
पिकांची वाढ खुंटली
जून व जुलै महिन्यातील सुरुवातीच्या काही सरींवर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली. मात्र, त्यानंतर दमदार पाऊस न झाल्याने पिके पाण्याअभावी करपून चालली आहेत. सोयाबीन शेंगा भरण्याच्या अत्यंत निर्णायक टप्प्यात असताना जमिनीतील ओलावा संपला आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून, अनेक ठिकाणी सोयाबीन पूर्णपणे वाळू लागले आहे. मूग पिकालाही या दुष्काळी परिस्थितीचा मोठा फटका बसला असून, बियाणे, खते, मशागत आणि मजुरीसाठी झालेला खर्चही निघणार नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
शेतकरी संकटात
परिसरात यंदा तूर पिकापाठोपाठ सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. कमी मशागत व कमी खर्चात येणारे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांचा कल सोयाबीन आणि तूर पिकाकडे वाढला आहे. हे पीक फायदेशीर ठरत असल्यानेच यंदा लागवड क्षेत्र वाढले आहे, परंतु पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहे. सध्या सोयाबीनला केवळ ४ ते ६ हजार रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पिकांना पाण्याची तीव्र गरज भासत आहे. ऐन वाढीच्या काळात पाऊस गायब झाल्याने यंदा उत्पन्नात मोठी घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. बाजारातील घसरलेले भाव आणि पावसाची अनिश्चितता यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. मागील वर्षीच्या नुकसानीतून शेतकरी अजून सावरलेला नाही. त्यातच यंदा किडींच्या थैमानामुळे तूर उत्पादन धोक्यात आले आहे. त्यामुळे कृषी विभागाने तातडीने शेतात येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि योग्य फवारणीबाबत मार्गदर्शन करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्र्यांनी केली आहे.
जलस्रोतांची पातळी खालावली
एकीकडे पिके धोक्यात आली असताना, दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची समस्याही गंभीर बनली आहे. विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांची पातळी खालावल्यामुळे भर पावसाळ्यात काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाऊस असाच लांबल्यास आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक बिकट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मोसंबी, डाळिंब बागांना फटका
तूर पिकाचीही अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पाण्याचा ताण पडल्याने पाने लालसर पडली असून, झाडांची वाढ थांबली आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची दाट शक्यता आहे. या दुष्काळी परिस्थितीचा फटका तालुक्यातील मोसंबी आणि डाळिंब बागांनाही बसत असून, ओलावा नसल्यामुळे फळांचा आकार आणि प्रतवारी ढासळण्याची चिंता उत्पादकांना लागली आहे.
पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. शेतात पाण्याअभावी सोयाबीन व मूग पीक करपले आहेत. पीक नुकसानभरपाई, सरसकट पीकविमा, वीजबिल माफी, पिण्याच्या पाण्याची सुरळीत व्यवस्था आणि शेतमालाला योग्य हमीभाव देण्यात यावा.
सूर्यकांत सोरटे, शेतकरी
बियाणे, खते, मशागत आणि मजुरीचा खर्चही निघण्याची चिंता आहे. सोयाबीन पिकाचे पाने लालसर पडली आहेत. तसेच, मोसंबी आणि डाळिंब बागाही संकटात आहेत.
आकाश सोरटे, शेतकरी