पिंपरी: झपाट्याने विकसित होत असलेल्या प्रभाग क्रमांक तीन हा माजी महापौर नितीन काळजे यांचा वर्चस्व असलेला प्रभाग आहे. माजी महापौरांच्या पॅनेलसह राष्ट्रवादी काँग््रेाससह शिवसेनेच्या उमेदवारांचे त्यांच्यासमोर आव्हान आहे. निष्ठावंतांची नाराजी तसेच, बदलेली राजकीय समीकरणामुळे भाजपाला निवडणूक सोपी नसल्याचे दिसत आहे.
प्रभागात माजी महापौर काळजे यांचे पॅनेल आहे. त्यांच्यासह माजी नगरसेविका सुवर्णा बुर्डे, सचिन तापकीर, सुनील काटे, योगेश तळेकर, रमेश वहिले, प्रीती तापकीर, मनीषा तापकीर, ज्ञानेश सस्ते, राजेश सस्ते, वंदना आल्हाट, अनुराधा साळुंके, सारिका गायकवाड, संतोष तापकीर हे इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून माजी नगरसेविका विनया तापकीर, लक्ष्मण सस्ते, प्रदीप तापकीर, मंदा आल्हाट, गणेश सस्ते, धनंजय आल्हाट, ॲड. कुणाल तापकीर, व इतर पक्षांचे उमेदवार रिंगणात असतील. विकासकामांचा निव्वळ बाऊ करण्यात आला आहे. नागरिकांना दररोज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. तसेच, भाजपच्या निष्ठावंतांना डावलणे, पक्षातील वरिष्ठांची मक्तेदारी, दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना पदे बहाल करणे आदी कारणांमुळे भाजपला निवडणूक सोपी नसल्याचे बोलले जात आहे.
प्रभागातील परिसर
मोशी गावठाण, गंधर्वनगरी, संत ज्ञानेश्वरनगर भाग, साई मंदिर परिसर, गोखले मळा, अलकापुरम सोसायटी, वडमुखवाडी, काळजेवाडी, पठारे मळा, ताजणे मळा, चोविसावाडी, चहोली, डुडुळगाव आदी
कचरा डेपोतील दुर्गंधीचा बारा महिने त्रास
अर्धा आणि एक गुंठा जागा घेऊन प्लॉटिंग करीत जागेची विक्री सुरू आहे. तेथे घरे बांधण्यात येत आहेत. इंद्रायणी नदीलगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग होत असल्याने अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन मिळत आहे. परिणामी, पुराचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जागा मालकांनी विरोध केल्याने महापालिकेचा चिखली व मोशी येथील टीपी स्कीम रद्द करण्यात आला आहे. मोशी येथील कचरा डेपोमुळे आजूबाजूच्या रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. हाऊसिंग सोसायट्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने खासगी टँकरने पाण्याची गरज भागवावी लागत आहे. सोसायटीधारकांच्या पाण्यासाठी तक्रार कायम आहेत.
प्रभागातील जागांचे आरक्षण
अ - एसी महिला
ब-ओबीसी
क-सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
सातशे बेडच्या रुग्णालयाचे काम वेगात
मोशी येथे 700 बेडचे मल्टिस्पेशिलिटी रुग्णालयाचे काम वेगात सुरू आहे. मोशी डेपोतील कचऱ्याचे डोंगर कमी करण्यासाठी बायोमॉनिंग केले जात असून, वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातून कचऱ्याची विल्हेवाट लावून 14 मेगा वॅट वीजनिर्मिती होत आहे. समाविष्ट गावांचा भाग असल्याने एकूण 50 किलोमीटर अंतराचे रस्ते नव्याने विकसित करण्यात आली आहेत. चऱ्होलीत वाघेश्वर क्रीडा, वाघेश्वर टेकडीवर उद्यान, मोशीत उद्यान, वडमुखवाडीत जलतरण तलाव, चऱ्होलीत अद्ययावत स्मशानभूमी, पाण्याच्या 5 टाक्या, चऱ्होली व मोशी अग्निशमन केंद्र, पद्मावती रुग्णालय आदी बांधण्यात आले आहे. लोकवस्ती वाढल्यानंतर त्या भागांत भूमिगत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. चऱ्होली येथे यशस्वीपणे पंतप्रधान आवास योजना राबविण्यात आली असून, शेकडो कुटुंबाना पक्की घरे मिळाली आहेत. डुडुळगाव येथील गृहप्रकल्प अंतिम टप्यात असून, लाभार्थ्यांना सदनिकेचे वाटप करण्यात येत आहे.