पिंपरी: सध्या सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे गावी, राज्याच्या बाहेर असलेल्या नातेवाईकांशी पत्राद्वारे संपर्क साधला जातो. महत्त्वाची कागदपत्रे, भेटवस्तू पाठविल्या जातात. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पोस्ट कार्यालयात सर्व्हर डाऊन आहे. त्यामुळे कुरिअर करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, कामासाठी वेळ लागत असल्याने नागरिकांकडून तक्रार करण्यात येत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या माहितीसाठी चिंचवड कार्यालयात सिस्टिमचा वेग कमी असल्याचा बोर्ड लावण्यात आला आहे. (Latest Pimpari chinchwad News)
दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे भेटवस्तूसोबतच मिठाई, फराळ गावी पाठवले जातात. तसेच, महत्त्वाची काही कागदपत्रेदेखील पाठवले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांची पोस्ट कार्यालयात मोठी गर्दी होते. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पोस्टाचे सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण उद्भवली असून, वेग मंदावला आहे. परिणामी, कामाला विलंब
लागत आहे. नागरिक ताटकळत बसल्याने संताप व्यक्त करत आहेत. याबाबत संबंधित पोस्ट कर्मचार्ऱ्यांना विचारले असता, त्यांनी या ठिकाणी नोटीस लिहिले असल्याकडे बोट दाखविले.
पोस्ट कार्यालयात सकाळी 8 ते रात्री 8 सेवा
स्पीड पोस्ट, पार्सल व इतर सेवा बुकिंगसाठी आता पोस्ट कार्यालयाने वेळेत वाढ केली आहे. त्यानुसार चिंचवड आणि हिंजवडी या दोन पोस्ट कार्यालयात सकाळी 8 ते रात्री 8 या दोन वेळेत सेवा सुरू करण्यात आली आहे. याबाबत कोणतेही अतिरीक्त शुल्क आकारले जाणार नाही. देशांतर्गत तसेच, परदेशात वस्तू पाठवणे सोपे होणार आहे. हिंजवडीमधील आयटीयन्स व इतर कर्मचार्ऱ्यांना फायदा होणार आहे.
चिंचवड पोस्ट कार्यालयातील आधीच सेवा सुधारणे आवश्यक आहे. सर्व्हरची अडचण असल्यास दोन खिडकी करण्याची तसदी घेणे आवश्यक होते. मात्र, तसे केले नाही. त्यामुळे आमच्या सारख्या ज्येष्ठांना ताटकळत उभे राहावे लागत आहे.- मिलिंद देशपांडे, स्थानिक नागरिक
पोस्टाच्या सेवेत कोणताच अडथळा नाही. तरी, त्याबाबत चौकशी करण्यात येईल. ग्राहकांना कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.- कौशल कुलकर्णी, उप विभागीय डाक निरीक्षक, चिंचवड