Post Office Savings Schemes Pudhari
पिंपरी चिंचवड

Post Office Savings Schemes: पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना नागरिकांची पसंती; सुकन्या, पीपीएफसह ज्येष्ठ नागरिक योजनेला प्रतिसाद

कमी गुंतवणुकीत बचत आणि निश्चित व्याजदराचा पर्याय; मुलांचे शिक्षण, निवृत्तीनंतरचे उत्पन्न आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी विविध योजना

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: भविष्यातील आर्थिक गरजा, मुलांचे शिक्षणानंतरचे आर्थिक नियोजन आणि नियमित उत्पन्नाची तरतूद करण्यासाठी नागरिकांकडून बचतीला प्राधान्य दिले जात आहे. सरकारी पाठबळ असलेल्या पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजनांकडे नागरिकांचा कल वाढत आहे. कमी रकमेपासून गुंतवणुकीची सुविधा, वेगवेगळे कालावधी आणि निश्चित व्याजदर यामुळे पोस्ट ऑफिसच्या योजनांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

विशेषतः ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ)व पोस्टल लाइफ इन्शुरन्स (पीएलआय) या योजनांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पिंपरी पोस्ट ऑफिसमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.

सुकन्या समृद्धी योजना

दहा वर्षांखालील मुलीच्या नावाने खाते उघडता येते. या योजनेतील पैसे मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी उपयोगी पडतात. भविष्यातील आर्थिक तरतुदीसाठी ही योजना उपयुक्त असून सध्या ८.२ टक्के व्याजदर आहे. योजनेची मुदत खाते उघडल्यापासून २१ वर्षे आहे.

निवृत्त व्यक्तींचा ज्येष्ठ नागरिक योजनेकडे कल

नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर उपलब्ध असलेल्या बचतीतून नियमित उत्पन्न मिळावे, या उद्देशाने ज्येष्ठ नागरिक बचत योजनेला प्राधान्य दिले जात आहे. या योजनेत पाच वर्षांची गुंतवणूक करता येते. कमाल ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणुकीची मर्यादा असल्याने निवृत्त व्यक्तींना आर्थिक नियोजनासाठी हा पर्याय उपलब्ध आहे. त्याचबरोबर मुलींच्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना आणि दीर्घकालीन बचतीसाठी पीपीएफ योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पोस्ट ऑफिसमधून बँकिंग सुविधाही

पोस्ट ऑफिसमधील बचत खातेधारकांना बँकिंग व्यवहारांच्या विविध सुविधा उपलब्ध आहेत. पोस्ट ऑफिसच्या संबंधित बचत खात्याला बँकिंग प्रणालीशी जोडलेल्या सुविधांद्वारे पैसे काढणे आणि जमा करणे शक्य होते. काही व्यवहारांसाठी इतर बँकांच्या सुविधांचाही वापर करता येतो. त्यामुळे पोस्ट ऑफिसमधील खाते केवळ बचतीपुरते मर्यादित न राहता दैनंदिन आर्थिक व्यवहारांसाठीही उपयुक्त ठरत आहे.

कमी हप्त्यात विमा संरक्षण

बचत योजनांबरोबरच पोस्ट ऑफिसकडून जीवन विम्याच्या योजनाही राबविल्या जातात. पोस्टल लाइफ इन्शुरन्स (पीएलआय) ही योजना १ फेब्रुवारी १८८४ पासून सुरू आहे. तर ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स (आरपीएलआय) ही योजना उपलब्ध आहे. तुलनेने परवडणाऱ्या हप्त्यात विमा संरक्षण मिळण्याची सुविधा या योजनांमधून दिली जाते. त्यामुळे बचतीसोबत कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेचाही विचार करता येतो.

बचतीसाठी विविध पर्याय उपलब्ध

  • बचत खाते : आवर्ती ठेव खाते (आरडी)

  • मुदत ठेव योजना (टाइम डिपॉझिट)

  • ज्येष्ठ नागरिक बचत योजना

  • मासिक प्राप्ती योजना

  • राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी)

  • किसान विकास पत्र

  • सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी

पोस्ट ऑफिसमध्ये नागरिकांच्या विविध आर्थिक गरजा लक्षात घेऊन अनेक बचत योजना उपलब्ध आहेत. ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना आणि पीपीएफला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांनी आपली आर्थिक क्षमता, गुंतवणुकीचा कालावधी आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन योग्य योजनेची निवड करावी. योजनांची सविस्तर माहिती पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे.
संजय आढारी, उपडाकपाल, पिंपरी कॉलनी
पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय नागरिकांसाठी उपयुक्त आहे. वेगवेगळ्या गरजांनुसार आणि आर्थिक क्षमतेनुसार योजना निवडता येतात. विशेषतः मुलांच्या भविष्यासाठी आणि निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनासाठी अशा योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
सुजया अमीन (नागरिक)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT