

बजरंग मासाळ
पिंपरी: उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये रोजगाराच्या शोधात येणाऱ्या कामगार कुटुंबांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनत आहे. बांधकाम प्रकल्प आणि विविध उद्योगांत काम करणाऱ्या कामगारांना रोजगाराच्या स्वरूपानुसार वारंवार राहण्याचे ठिकाण बदलावे लागते. मात्र, पालकांच्या रोजगारासाठी सुरू असलेल्या या स्थलांतराचा थेट परिणाम त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर होत आहे.
कामगारांचे कामाचे ठिकाण बदलले की त्यांच्या पाल्याची शाळाही बदलावी लागते. नव्या शाळेत प्रवेशासाठी धावपळ करावी लागते आणि पुन्हा नव्या शैक्षणिक वातावरणाशी जुळवून घ्यावे लागते. या सगळ्या प्रक्रियेत मुलांच्या शिक्षणाचे सातत्य हरवण्याची भीती निर्माण झाली आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणातूनही स्थलांतरित बालकांची संख्या समोर आली असताना, या मुलांचे शिक्षण अखंडित ठेवण्याची जबाबदारी आता महापालिका शिक्षण विभागासमोर उभी ठाकली आहे.
शाळा बदलली की,अभ्यासाचे गणितही बिघडते!
कामगार कुटुंबांचे स्थलांतर अनेकदा अचानक होते. कारखान्यातील काम संपणे, ठेकेदार बदलणे, बांधकाम प्रकल्प पूर्ण होणे किंवा दुसऱ्या ठिकाणी रोजगाराची संधी मिळणे, अशा कारणांमुळे कुटुंबाला राहण्याचे ठिकाण बदलावे लागते.
अशावेळी मुलांच्या शाळेचा प्रश्न निर्माण होतो. मागील शाळेची कागदपत्रे, शैक्षणिक नोंदी आणि नव्या शाळेतील प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करताना पालकांची दमछाक होते. अनेक कामगारांना रोजंदारीवर काम करावे लागत असल्याने प्रवेशासाठी वारंवार शाळांमध्ये जाणेही शक्य होत नाही.
शाळा बदलल्यानंतर अभ्यासक्रम, शिकवण्याची पद्धत आणि भाषेतील फरक यांच्याशी मुलांना जुळवून घ्यावे लागते. विशेषतः परराज्यांतून आलेल्या मुलांसाठी मराठी माध्यमातील शिक्षण समजून घेणे सुरुवातीला आव्हानात्मक ठरू शकते. काही मुले नव्या शाळेत दाखल होतात. मात्र, आधीच्या अभ्यासक्रमातील तफावतीमुळे त्यांचा शैक्षणिक पाया कमकुवत होण्याची शक्यता असते. वारंवार शाळा बदलण्याच्या या प्रक्रियेत मुलांचा आत्मविश्वासही कमी होऊ शकतो, असे शिक्षक तसेच पालकांचे मत आहे
स्थलांतरित मुलांचे शिक्षण वाऱ्यावर
रोजगाराच्या शोधात कामगार कुटुंबांना वारंवार राहण्याचे ठिकाण बदलावे लागते. मात्र, या स्थलांतरात मुलांच्या शिक्षणाचा विचार मागे पडतो. एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जाताना प्रवेश प्रक्रिया, कागदपत्रांची पूर्तता, भाषेतील अडचणी आणि अभ्यासक्रमातील बदल अशा अनेक समस्यांना मुलांना सामोरे जावे लागते.
काही मुलांचे शिक्षण नव्या ठिकाणी पुन्हा सुरू होते, तर काहींचा शाळेशी संपर्कच तुटतो. शिक्षण हमीपत्राची व्यवस्था असली, तरी स्थलांतरानंतर मुलांचा प्रवेश निश्चित झाला का?, त्यांची उपस्थिती नियमित आहे का?, याचा पाठपुरावा होणे गरजेचे आहे.
शिक्षण हमीपत्राची तरतूद आहे, पण पाठपुरावा कुठे?
स्थलांतरित बालकांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी शासनाने शिक्षण हमीपत्राची व्यवस्था केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने ३ नोव्हेंबर २०१६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार स्थलांतरित आणि शाळेत अनियमित राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत.
स्थलांतरित बालकांना शिक्षण हमीपत्र देणे, नव्या ठिकाणच्या शाळेशी समन्वय साधणे आणि त्यांचे शिक्षण सुरू राहील याची खात्री करणे अपेक्षित आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमधून अन्यत्र गेलेल्या १२५ बालकांपैकी ११७ बालकांना शिक्षण हमीपत्र देण्यात आल्याची नोंद असली, तरी या मुलांना प्रत्यक्षात नव्या ठिकाणी प्रवेश मिळाला का?, त्यांची उपस्थिती नियमित आहे का? आणि त्यांचे शिक्षण सुरू आहे का?, याची माहिती महत्त्वाची ठरते.
प्रवेशाच्या आकडेवारीपलीकडे शिक्षणाचा मागोवा हवा
शहरात बाहेरून आलेल्या २२७ बालकांना शाळेत दाखल केल्याची नोंद महापालिकेच्या सर्वेक्षणात आहे. ही बाब सकारात्मक असली, तरी प्रवेशानंतर या मुलांची नियमित उपस्थिती, शैक्षणिक प्रगती आणि पुढील शिक्षणातील सातत्य तपासणे आवश्यक आहे.
दीर्घकाळ अनुपस्थित राहणाऱ्या मुलांच्या पालकांशी संपर्क साधणे, स्थलांतर झाल्यास नव्या शाळेशी समन्वय ठेवणे आणि शिक्षणात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना पूरक मदत उपलब्ध करून देणे, यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असणे गरजेचे आहे.
रोजगारासाठी शहरात येणाऱ्या कामगारांच्या कुटुंबांना उदरनिर्वाहाची चिंता असते. मात्र, त्यांच्या या संघर्षात मुलांचे भविष्य भरडले जाता कामा नये. पालकांचे स्थलांतर अपरिहार्य असले, तरी मुलांचे शिक्षण वारंवार खंडित होणे अपरिहार्य नाही.
सर्वेक्षणात किती मुले आढळली आणि किती जणांना शाळेत दाखल केले, याची आकडेवारी मांडण्यापलीकडे जाऊन स्थलांतरानंतरही किती मुले नियमित शिक्षण घेत आहेत, याचा मागोवा घेण्याची जबाबदारी महापालिका शिक्षण विभागाने पार पाडणे आवश्यक आहे; अन्यथा पालकांचा रोजगारासाठीचा प्रवास सुरूच राहील. मात्र, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रवास प्रत्येक स्थलांतरा वेळी पुन्हा नव्याने सुरू करण्याची वेळ येत राहील.
स्थलांतरित बालकांच्या शिक्षणाचे वास्तव शाळाबाह्य आढळलेली बालके : १२४ शाळेत दाखल केलेली बालके : ११७ अनियमित उपस्थिती असलेली बालके : ७ पिंपरी-चिंचवडमधून स्थलांतरित बालके : १२५ पुणे जिल्ह्यांतर्गत स्थलांतरित : ४९ अन्य जिल्ह्यांत स्थलांतरित : ७० परराज्यात स्थलांतरित : ६ शिक्षण हमीपत्र दिलेली बालके : ११७ अन्य भागांतून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेली बालके : २२७ शहरात दाखल झालेली स्थलांतरित बालके : २२७ कालावधी : १५ ते ३० जुलै २०२६
स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये त्यांना कधीही प्रवेश घेता येतो. प्रवेशासाठी दाखल्याअभावी मुलांना अडवले जात नाही. संबंधित संस्था किंवा पालकांकडून उपलब्ध माहितीनुसार मुलांचे प्रवेश करून घेतले जातात. त्यानंतर यू-डायस प्रणालीवर आवश्यक शैक्षणिक नोंदी व दाखल्यांची पूर्तता केली जाते. त्यामुळे कागदपत्रांअभावी कोणत्याही मुलाचे शिक्षण थांबू नये, याची दक्षता घेतली जाते.
- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, महापालका मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज