पिंपरी: जो तो उठतोय तो मला उपदेशच करायला लागतो. सगळा मक्ता मीच घेतलाय, यांनी नुसते उपदेशच करायचे, हे सगळं ऐकलं ना, तेव्हा कुठून या पुण्याचा पालकमंत्री झालो, असं वाटायला लागलंय, असा टोला उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये एका कार्यक्रमात माजी नगरसेवकाच्या प्रश्नाला उत्तर देताना हाणला.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सह्याद्री देवराई फाऊंडेशनच्या वतीने कलाकार सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री पवार उपस्थित होते. तसेच यावेळी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील उपस्थिती लावली होती. (Latest Pimpri News)
दरम्यान, पालकमंत्री पवार यांचे बोलणे संपल्यानंतर माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी शहरांमध्ये होणार्या वृक्षतोडीबाबत लक्ष वेधले. ते म्हणाले की, पवना इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प अंतर्गत हजारो झाडे तोडली जाणार आहेत. निगडी येथील दुर्गादेवी टेकडीवरील झाडांवर कुर्हाड पडणार आहे. महापालिका आयुक्त तेथे प्रकल्प आणणार आहेत. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी तसेच एमआयडीसी भागात देखील वृक्षतोड चालू आहे, ही बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली तसेच, आपण पालकमंत्री या नात्याने वृक्षतोड थांबावी, अशी मागणी त्यांनी केली.
हे सर्व ऐकून घेतल्यानंतर पालकमंत्री अजित पवार म्हणाले की, कुठून या पुण्याचा पालकमंत्री झालो. जो तो मलाच उपदेश करायला लागतो. सगळा मक्ता मीच घेतला, असे बोलत त्यांनी आपले आसन गाठले.
राज्यात यंदा दहा कोटी झाडे
या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री अजित पवार म्हणाले की, यंदा महायुतीच्या वतीने राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दहा कोटी झाडे लावण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये एक कोटी झाडे लावण्यात येणार आहे. इतरही जिल्ह्यांमध्ये ती योजना राबवण्यात येईल. पुढील चार वर्षांमध्ये प्रत्येकी 25 कोटी झाड लावण्याचे उद्दिष्ट आहे; तसेच ती झाडे कशी चांगली राहतील याबाबत देखील आमचा प्रयत्न राहणार आहे.