पिंपरी: मौजमजेसाठी बनावट कागदपत्रे तयार करून विविध बँकांकडून लाखो रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेणार्या आरोपीला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आरोपीने आत्तापर्यंत 51 लाखांची फसवणूक केल्याचे समोर असून आणखी 20 व्यक्तींच्या नावाने कर्ज घेण्यासाठी बनावट फाईल्स तयार करण्यात आल्या होत्या.
युवराज भरत तिवडे (रा. यशवंतनगर, स्वराज गार्डन, पिंपळे सौदागर, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.(Latest Pimpri News)
वरिष्ठ निरीक्षक रविकिरण नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी यांना गोपनीय माहिती मिळाली की, चिंचवड येथील एका बँकेत एका व्यक्तीने बनावट कागदपत्रांच्या आधारे वेगवेगळ्या नावाने वैयक्तिक कर्ज घेतले आहे. तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केल्यानंतर आरोपी विविध मोबाईल नंबरचा वापर करून पत्ते बदलत कर्ज घेत असल्याचे समोर आले.
या माहितीनुसार पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली. यातील एका पथकाने आरोपीला सापळा रचून मोशी टोलनाका येथे ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपीने सुरुवातीला खोटी नावे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला सायबर पोलिस ठाण्यात आणल्यावर त्याने आपले खरे नाव कबूल केले. पुढील चौकशीत आरोपीने वेगवेगळ्या सायबर कॅफेमधून संगणकाच्या डेटाचा वापर करून पॅन कार्डवरील नंबर मिळवले.
त्यानंतर आधार कस्टमर केअरशी संपर्क साधून त्या पॅन कार्डधारकाचे आधार क्रमांक मिळवले. त्या आधारवर बनावट ओळखपत्र तयार करून त्याद्वारे विविध बँकांतून लोन घेतल्याचे समोर आले.
20 जणांच्या नावाने कर्ज घेण्याच्या तयारीत
आरोपीने चिंचवडमधील एका व्यक्तीच्या नावाने 18 लाखांचे, दुसर्या दोन व्यक्तींच्या नावाने अनुक्रमे 18 लाख आणि 15 लाखांचे असे एकूण 51 लाखांचे वैयक्तिक कर्ज घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय त्याच्याकडे आणखी 20 व्यक्तींच्या नावाने कर्जासाठी तयार केलेल्या फाईल्सही आढळून आल्या. आरोपीला तपासासाठी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या पथकाची कामगिरी
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे, पोलिस अंमलदार अतुल लोखंडे, प्रिया वसावे, हेमंत खरात, दीपक भोसले, नितेश बिच्चेवार, सुरंजन चव्हाण, स्वप्निल खणसे, विशाल निश्चित, महेश मोटकर यांनी ही कामगिरी केली.