Police Bikes Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Police Bikes: स्टंटबाज आणि सोनसाखळी चोरट्यांसाठी पोलिसांची ‘धूम’ तयारी; 400 सीसी बाईक्सचा ताफा सज्ज

पिंपरी-चिंचवड पोलिसांना हायटेक दुचाकींची साथ; पाठलाग व गस्त अधिक प्रभावी होणार

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात स्टंटबाजी करणारे हायस्पीड रायडर्स आणि सोनसाखळी चोरट्यांना पकडण्यासाठी आता पोलिस धूम स्टाईलमध्ये चोरट्यांचा पाठलाग करणार आहेत. आतापर्यंत कमी क्षमतेच्या दुचाकींमुळे चोरट्यांचा पाठलाग करताना अडचणी येत होत्या; मात्र आता 400 सीसी क्षमतेच्या हायटेक बाईक्समुळे पिंपरी- चिंचवड पोलिस दलाला नवी ताकद मिळाल्याचे चित्र आहे.

औद्योगिकनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये महागड्या स्पोर्ट्स बाईक्सवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे. यामुळे अपघातांचा धोका वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेवर परिणाम होत होता. त्याचबरोबर सोनसाखळी चोरही उच्च क्षमतेच्या दुचाकींवरून क्षणार्धात पसार होत असल्याने पोलिसांना त्यांचा पाठलाग करणे कठीण जात होते.

दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाने प्रत्येक पोलिस ठाण्यासाठी 400 सीसी क्षमतेच्या आधुनिक दुचाकी उपलब्ध करून दिल्या आहेत. जलद वेग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे या बाईक्स पाठलागासाठी अधिक सक्षम ठरणार आहेत. त्यामुळे स्टंटबाजांवर नियंत्रण ठेवणे आणि चोरट्यांना त्वरित पकडणे शक्य होणार असल्याचा दावा केला जात आहे. बजाज कंपनीच्या या बाईक्स असून त्यातील बहुतांश विशेष शाखेला देण्यात आल्या आहेत. उर्वरित बाईक्स गुन्हे शाखेकडे गस्तीसाठी वापरल्या जाणार आहेत.

दुचाकींची वैशिष्ट्ये

या हायटेक बाईक्समध्ये तीन डिकी असून, त्यातील एका डिकीमध्ये प्रथमोपचार साहित्य ठेवण्यात आले आहे. अपघाताच्या ठिकाणी पोहोचताच पोलिस जखमींना तातडीने मदत करू शकतील. तसेच बाइक्सवर पोलिस लाइट, सायरन आणि मेगाफोन बसविण्यात आले आहेत. त्यामुळे पाठलाग करताना इतर वाहनांना सतर्क करणे सोपे होणार आहे.

गस्त अधिक प्रभावी

आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी खरेदी करण्यात आलेल्या 100 हायटेक दुचाकींमधून 25 बाइक्स पिंपरी-चिंचवड पोलिसांना देण्यात आल्या आहेत. उर्वरित बाइक्स पुणे शहर व ग्रामीण पोलिसांकडे वितरित करण्यात आल्या आहेत. या नव्या बाइक्समुळे शहरातील गस्त अधिक प्रभावी होऊन गुन्हेगारांवर जलद कारवाई करणे शक्य होणार आहे. परिणामी, नागरिकांच्या सुरक्षेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी कमी क्षमतेच्या दुचाकींमुळे वेगाने गाडी चालवणाऱ्या गुन्हेगारांचा पाठलाग करताना तांत्रिक व वेगासंबंधी मर्यादा जाणवत होत्या. विशेषतः स्टंटबाजी करणारे तसेच सोनसाखळी चोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले आरोपी उच्च क्षमतेच्या वाहनांचा वापर करून अल्पावधीत पसार होत असल्याने त्यांना पकडणे आव्हानात्मक ठरत होते. पोलिस दलात आता 400 सीसी क्षमतेच्या अत्याधुनिक दुचाकींचा समावेश करण्यात आला आहे. या बाइक्सच्या माध्यमातून घटनास्थळी जलद प्रतिसाद देणे, संशयितांचा प्रभावी पाठलाग करणे तसेच गस्त अधिक गतिमान आणि परिणामकारक करणे शक्य होणार आहे.
सारंग आवाड, अपर पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT