पिंपरी: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील अतिक्रमणे व अनधिकृत होर्डिंग हटविण्यासाठी पथक कार्यरत आहे; मात्र या पथकात अवघे दोनच अधिकारी आहेत. परिणामी, नियोजित कारवाया लांबणीवर पडणार असल्याची चिन्हे आहेत.
पीएमआरडीए हद्दीत अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे व विनापरवाना होर्डिंग उभारण्यात आले आहेत. तसेच, रस्त्यालगतदेखील मोठे अतिक्रमण आहे. गेल्या वर्षभरात अतिक्रमण विरोधी पथकातील धडाकेबाज अधिकार्यांनी अतिक्रमणांवर कारवाईचे सत्र सुरू केल्याने अतिक्रमणांना चाप बसला होता; मात्र त्या अधिकार्यांची बदली झाल्यानंतर अतिक्रमाणांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणी सक्षम अधिकारी नेमणे गरजेचे आहे. (Latest Pimpri News)
राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमात पीएमआरडीएचा तिसरा क्रमांक आला होता. त्यात अतिक्रमणविरोधी पथक हे सर्वोत्कृष्ट पथक म्हणून गौरवले गेले होते. या पथकातील सक्षम अधिकार्यांच्या कारवाईमुळे अनधिकृत होर्डिंगधारक आणि अनधिकृत बांधकाम करण्यार्यांचे धाबे दणाणले होते.
दरम्यान, या विभागातील तीन अधिकार्यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या आहेत. परिणामी, आता या विभागाचे प्रमुख म्हणून सहआयुकत आणि अन्य एक तहसीलदार हे दोनच अधिकारी आहेत. तर, अन्य कंत्राटी अभियंते व कर्मचारी आहेत.
परिणामी, या विभागाकडून महामार्गालगत उभारलेली अनधिकृत होर्डिंग आणि मावळ, मुळशी या पट्ट्यातील वाढत जाणार्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार होती; मात्र आता अपुर्या मनुष्यबळामुळे कारवाई लांबणीवर पडणार असल्याचे चित्र आहे.
अनधिकृत बांधकामविरोधी समिती कागदावरच
पीएमआरडीएच्या पुढाकाराने सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमुळे अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवणे सोपे होणार आहे. तलाठी, पोलिस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक हे या समितीमध्ये सदस्य आहेत; मात्र या समितीचा प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पडून असल्याचे सांगण्यात येत आहे.