Tourism Development Pudhari
पिंपरी चिंचवड

Pune Tourism Development: मावळ-मुळशी-हवेली पर्यटनाला बूस्ट; पीएमआरडीएचा 67 कोटींचा विकास आराखडा

खडकवासला चौपाटी, लोणावळा स्कायवॉकसह पायाभूत सुविधा सुधारणा; पर्यटनाला नवी ओळख मिळणार

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: जिल्हयातील मावळ, मुळशी आणि हवेली हे निसर्गाचा वरदहस्त लाभलेले तालुके असून, येथील विविध ठिकाणे पाहण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे ही पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी पीएमआरडीएकडून पर्यटन विकास आराखडा जाहीर करण्यात आला आहे. या तीन तालुक्यांतील पर्यटनस्थळे व परिसर विकसित झाल्यास जिल्ह्यातील पर्यटनाला बूस्ट मिळू शकेल.

पीएमआरडीएने मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यातील प्रमुख पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 67 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. मुख्यमंत्री तथा पीएमआरडीएचे अध्यक्ष यांनी या प्रकल्पांना मान्यात दिली असून, यात रस्ते विकास, पार्किंग, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थांवर विशेष भर दिला जाणार आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी देखील त्याबाबत सूचना दिल्यानंतर आता या कामांना आता गती मिळाली आहे. यामुळे ट्रेकर्स आणि पर्यटकांना दुर्गम भागात पोहोचणे अधिक सुखकर होणार आहे.

खडकवासला धरण परिसरात चौपाटी

पुणेकरांचे हक्काचे आणि आवडते ठिकाण म्हणून खडकवासला धरण परिसराकडे पाहिले जाते. या धरण परिसराचा विकास करून येथे चौपाटी निर्माण केली जाणार आहे. खडकवासला धरण परिसर पावसाळ्यात पर्यटकांच्या गर्दीने ओसंडून जाते; मात्र, परिसरात पार्किंग, स्वच्छता आणि सुरक्षेचा अभाव असल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होते. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) 1 कोटी रुपयांच्या निधीतून येथे सुसज्ज चौपाटी विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेसाठी धरणाच्या कडेला ‌‘चेनलिंक फेन्सिंग‌’ (संरक्षक कुंपण) उभारले जाणार आहे.

तलाव सुशोभीकरण अन्‌‍ स्कायवॉक

मुळशी तालुक्यातील पळशे धबधबा येथे दरड कोसळण्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी संरक्षक जाळ्या, रेलिंग आणि रस्ते सुधारणेला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच मुळशी तलावाचे सुशोभीकरण आणि पार्किंगसाठी 2 कोटींची तरतूद आहे. हडशी येथील श्री सत्य साई पांडुरंग क्षेत्रासाठी 3 कोटी, तर मावळमधील मुगाव ते ताम्हिणी घाट दरम्यानच्या 14 कि.मी. रस्त्यासाठी 10 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याशिवाय, लोणावळा येथे 822 कोटी रुपये खर्चून उभारला जाणारा ‌‘स्कायवॉक‌’ हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

आठ तीर्थक्षेत्रांलगतच्या मंदिर परिसराचा विकास

जिल्हयातील 8 धार्मिक स्थळांचा परिसर आणि विकासाच्या दृष्टीने कामे सुरू करण्यात येणार आहे. त्यातील श्री चिंतामणी गणपती मंदिर, महादेव मंदिर, एकविरा देवी मंदिर, श्री महागणपती मंदिर, मळाईदेवी मंदिर, बनेश्वर महादेव मंदिर आणि श्री विठ्ठल मंदिर या ठिकाणी सोलर व्यवस्था, वाहनतळ, निवारा शेड, पिण्याच्या पाणी आणि स्वच्छतागृहे अशी सुमारे 47 कोटींची कामे देखील उभारण्यात येणार आहे.

पर्यावरण रक्षणासाठी 27 गावांत ‌‘एसटीपी‌’

पर्यटन विकासासोबतच पर्यावरण रक्षणासाठी खडकवासला आणि पवना धरण क्षेत्रातील 27 गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसाठी 1 हजार 209 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. धरणे आणि नद्यांचे प्रदूषण रोखण्यास मदत होईल. या नवीन स्ट्रक्चरल प्लानमुळे पुणे जिल्ह्यातील पर्यटनाला नवी ओळख मिळणार असून, स्थानिक स्तरावर रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

असा होईल विकास

  • गड-किल्ल्यांच्या कनेक्टिव्हिटीसाठी

  • राजमाची किल्ला: 14 कि.मी. रस्त्यासाठी 17 कोटी रुपये.

  • लोहगड किल्ला : 5.50 कि.मी. रस्त्यासाठी 7 कोटी रुपये.

  • तिकोना व पवना परिसर: 6.50 कि.मी. रस्त्यासाठी 8 कोटी रुपये.

  • तुंग किल्ला : 4 कि.मी. रस्त्यासाठी 6 कोटी रुपये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT