PMRDA  Pudhari
पिंपरी चिंचवड

PMRDA Road Projects Audit: पीएमआरडीएच्या 29 रस्ते प्रकल्पांना गती; ‘थर्ड पार्टी’ ऑडिट अनिवार्य

कामाच्या गुणवत्तेवर भर; पावसाळ्यापूर्वी प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट, ग्रामीण विकासाला चालना

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाची पावले उचलली आहेत. प्राधिकरणाच्या 29 महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचा आढावा घेत पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी कामांना गती देण्याचे निर्देश दिले असून, कामाच्या गुणवत्तेसाठी ‌‘थर्ड पार्टी‌’ ऑडिट अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे प्रकल्पांमध्ये पारदर्शकता वाढण्याबरोबरच टिकाऊ दर्जाही सुनिश्चित होणार आहे.

पीएमआरडीएचे कार्यक्षेत्र तब्बल 5,215 चौरस किलोमीटर इतके विस्तीर्ण असून, त्यात मावळ, मुळशी, हवेली, भोर, दौंड, शिरूर, खेड, पुरंदर आणि वेल्हे या नऊ तालुक्यांतील 674 गावांचा समावेश आहे. या ग््राामीण भागांमध्ये सक्षम रस्ते जाळे उभारल्यास औद्योगिक, व्यावसायिक आणि सामाजिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे.

कामांना वेग देण्यावर भर:

अभियांत्रिकी विभागासोबत झालेल्या बैठकीत आयुक्तांनी प्रलंबित आणि सुरू असलेल्या प्रकल्पांचा सखोल आढावा घेतला. विशेषतः पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. रस्त्यांच्या कामांमध्ये होणारा विलंब टाळण्यासाठी तांत्रिक प्रक्रियांमध्ये शिस्त आणण्याच्या सूचना देण्यात आल्या.

गुणवत्तेबाबत तडजोड नाही:

रस्ते बांधकामात कोणतीही तडजोड न करण्याचा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. यासाठी त्रयस्थ सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून, ही संस्था प्रत्यक्ष स्थळावर जाऊन कामाची गुणवत्ता, वापरलेले साहित्य आणि तांत्रिक बाबींची तपासणी करणार आहे. यामुळे सरकारी निधीचा योग्य वापर होऊन रस्ते अधिक टिकाऊ होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अभियंत्यांना विशेष प्रशिक्षण:

प्रकल्पांची अंमलबजावणी अधिक अचूक आणि नियोजनबद्ध व्हावी यासाठी अभियंत्यांना प्रशिक्षण देण्यात आले. 18 फेबुवारी रोजी आयोजित विशेष सत्रात सार्वजनिक बांधकाम विभागातील अनुभवी कार्यकारी अभियंता नंदकुमार कोरके यांनी ममोजमाप पुस्तिकाफ (एमबी) शास्त्रीय पद्धतीने कशी भरावी याबाबत मार्गदर्शन केले. तांत्रिक नोंदी अचूक ठेवल्यास प्रकल्पांना विलंब होणार नाही, यावर त्यांनी भर दिला.

ग््राामीण विकासाला चालना:

पीएमआरडीए क्षेत्रातील ग््राामीण भाग मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रस्ते जोडणी अत्यंत महत्त्वाची आहे. सध्या अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधा पोहोचण्यात अडचणी येतात. सुधारित रस्ते नेटवर्कमुळे वाहतूक सुलभ होऊन बाजारपेठ, शिक्षण आणि आरोग्य सुविधा अधिक सहज उपलब्ध होतील.

पारदर्शकता आणि जबाबदारी:

‌‘थर्ड पार्टी‌’ ऑडिटमुळे प्रकल्पांमध्ये पारदर्शकता वाढणार असून, संबंधित कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित होणार आहे. यामुळे कामाचा दर्जा राखला जाईल आणि भष्टाचाराला आळा बसण्यास मदत होईल.

गती, गुणवत्ता अन्‌‍ पारदर्शकतेवर भर

एकूणच, पीएमआरडीएने रस्ते प्रकल्पांच्या अंमलबजावणीत गती, गुणवत्ता आणि पारदर्शकता यावर भर देत ग््राामीण विकासाचा मजबूत पाया घालण्याचे संकेत दिले आहेत. आगामी काळात या उपक्रमांचा प्रत्यक्ष परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर सकारात्मक स्वरूपात दिसून येण्याची अपेक्षा आहे.

दृष्टिक्षेपात प्रकल्प स्थिती :

  • एकूण रस्ते प्रकल्प : 29

  • मुळशी तालुका : 3 प्रकल्प - 1 पूर्ण, 2 प्रगतीपथावर

  • पुरंदर तालुका : 2 प्रकल्प - प्रगतीपथावर

  • कार्यक्षेत्र : 9 तालुके, 674 गावे

  • मुख्य उद्दिष्ट : पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT