

पिंपळे गुरव: परिसरातील सृष्टी चौक, कल्पतरू सिग्नल परिसर तसेच राजमाता जिजाऊ उद्यान चौक येथे शाळा व खासगी क्लासेसच्या बेकायदेशीर जाहिरातींचा अक्षरशः सुळसुळाट झाल्याचे चित्र समोर आले आहे. सिग्नलच्या खांबांवर, रस्त्यांच्याकडेला आणि सार्वजनिक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावण्यात आल्याने शहराचे विद्रूपीकरण होत असून, नागरिकांमध्ये तीव नाराजी व्यक्त होत आहे.
अपघाताचा धोका
विशेष म्हणजे, सृष्टी चौक हा वाहतुकीच्यादृष्टीने अत्यंत गजबजलेला आणि संवेदनशील भाग आहे. या ठिकाणी सिग्नल असतानाही शेजारील खांबांवर जाहिरातींचे फलक लावले गेल्याने वाहनचालकांचे लक्ष विचलित होत आहे. सिग्नल स्पष्ट दिसण्यात अडथळे निर्माण होत असून, वळण घेताना समोरील वाहनांचा अंदाज न आल्याने अपघाताचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नियमांचे सर्रास उल्लंघन
दरम्यान, शाळांना सध्या सुट्या असतानाच नवीन बॅचेसच्या नावाखाली क्लासेसचे शहरभर पेव फुटले आहे. कोणतीही अधिकृत परवानगी न घेता सार्वजनिक मालमत्ता आणि सिग्नलच्या खांबांचा वापर करून हे फलक उभारले जात असल्याने नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट दिसते. शाळांना सुट्या लागताच क्लासेसच्या जाहिरातींचा अक्षरशः पूर आला आहे. प्रशासनाकडून कोणतीही परवानगी न घेता हे फलक लावले जात आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
संबंधितांवर कारवाईची मागणी
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. बेकायदेशीर फ्लेक्स त्वरित काढून टाकत संबंधित शाळा व क्लासेसवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच, भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी कडक नियंत्रण ठेवावे, अशी मागणी जोर धरत आहे. आता महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागासह संबंधित प्रशासन या गंभीर प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाईचा बडगा उगारणार का, की शहराचे विद्रूपीकरण असेच सुरू राहणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने बेकायदेशीर फ्लेक्सची दखल घेतली असून, ते तात्काळ हटवले जातील. तसेच, संबंधितांवर दंडात्मक कारवाई करून नोटिसा देण्यात येणार असून, पुढे अशा प्रकारांवर कडक नियंत्रण ठेवले जाईल.
राजू वेताळ, कार्यालयीन अधीक्षक आकाशचिन्ह परवाना, मनपा