पिंपरी: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेतून सर्वसामान्यांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याच्या मोहिमेला मोठी गती दिली आहे.
विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यात ‘पीएमआरडीए’ हे पुणे विभागातील सर्वात मोठे प्राधिकरण ठरले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (पीएमएवाय) सर्वाधिक 3,317 घरे देऊन प्राधिकरणाने गोरगरिबांच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे.
हक्काच्या घरासाठी 2021 पासून उभारण्यात येत असलेल्या या सदनिकांसाठी 8 एप्रिल रोजी पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील सोडत काढण्यात आली होती. यामध्ये पेठ क्रमांक 12 व 30-32 मधील एकूण 1,029 घरांचा समावेश होता. आता दुसऱ्या टप्प्यातील घरांसाठी सेक्टर 12, फेज 1 आणि 31-32 या भागात प्राधिकरणाने आतापर्यंत ईडब्ल्यूएससाठी 4,882 आणि अल्प उत्पन्न गटासाठी (एलआयजी) 1,565 घरांचे नियोजन केले आहे.
पेठ क्रमांक 12, टप्पा 2 अंतर्गत 6,452 सदनिकांचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाचे सुमारे 82 टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पात ईडब्ल्यूएस ‘ए’ प्रकारच्या 3,320 सदनिका आणि ईडब्ल्यूएस ’बी’ प्रकारच्या 332 सदनिका बांधण्यात येत आहेत. तसेच, एलआयजी ‘ए’ गटातील 1,456 सदनिका आणि ‘बी’ गटातील 1,344 सदनिकांचा यात समावेश आहे.
या गृहप्रकल्पासाठी पीएमआरडीएकडून 728.96 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली असून, 1,102 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मे. बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजी प्रा. लि. यांच्यामार्फत हे काम केले जात असून, गृहप्रकल्पाच्या आवारातच 83 दुकानांचीही सोय करण्यात आली आहे. या प्रकल्पास पर्यावरण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा (एमपीसीबी) संमती आदेशही प्राप्त झाला असून, काम अंतिम टप्प्यात आहे.