पिंपरी: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील लाखों गणेशभक्तांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ( पीएमपी) सज्ज झाली आहे. गणेशोत्सवात शहरातील रस्त्यांवर मोठया प्रमाणात गर्दी होत असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे हे महत्त्वाचे आव्हान असते. यासाठी अतिरिक्त बससेवा, रात्रपाळी बससेवेचे नियोजन केले जात असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
गणेशोत्सवातील विविध कार्यक्रम, देखावे, गणेश मंडळांना भेटी तसेच विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी नागरिका मोठया संख्येने पुण्यात जातात. अनेक नागरिक खाजगी वाहनांऐवजी पीएमपीएमएल बसचा पर्याय निवडतात. त्यामुळे गर्दीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित आणि शक्य तितका सुलभ प्रवास उपलब्ध करुन देण्यासाठी पीएमपीएलकडून विशेष नियोजन केले जाते.
सुरक्षेला महत्त्व
गणेशोत्सवाच्या काळात रात्रीच्या वेळी महिला प्रवाशांनी संख्या मोठी असते. त्यामुळे महिलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने बसमधील सुरक्षा यंत्रणेला विशेष महत्त्व दिले जाते. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून निगराणी ठेवण्यासह, प्रवाशांच्या सुरक्षितेतसाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर दिला जातो. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेवण्याचेही नियोजन केले जात आहे.
रात्रभर बससेवा, परतीचीही सोय
गणेशोत्सवातील आकर्षण केवळ दिवसभरापुरते मर्यादित नसते. रात्री उशिरापर्यंत गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत आणि आवश्यकतेनुसार रात्रभर बससेवा सुरु ठेवण्याचे नियोजन पीएमपीएलकडून करण्यात येणार आहे.
चालक-वाहकांची भूमिका महत्त्वाची
गणरायाच्या उत्सव सुरू असताना संपुर्ण शहर या उत्सवाचा आनंद घेत असते. त्यांना या उत्सवाचा आनंद घेता यावा, यासाठी पीएमपीएमएलचे चालक आणि वाहक मात्र आपल्या कर्तव्यावर हजर असतात. त्यासोबतच गणेशोत्सवाच्या काळात पीएमपीएमएल बससेवेची मागणी वाढत असल्याने चालक-वाहकांना आतिरिक्त जबाबदारी पार पाडावी लागते. गर्दीच्या रस्त्यांवर बस चालविण्यातून ते रात्री उशिरापर्यंत प्रवाशांना घरी पोचविण्यापर्यंत त्यांची भूमिका महत्त्वातची ठरते.