

पिंपरी: अनेकवेळा कौटुंबिक अडचणी, वैद्यकीय कारणामुळे, मुसळधार पाऊस, किंवा रेल्वेगाड्या रद्द होणे आणि गाडयांच्या मार्गात बदल अशा विविध कारणांमुळे पुणे रेल्वे विभागातील २५ लाख ४२ हजार ६४५ प्रवाशांनी गेल्या चार महिन्यांत म्हणजेच एप्रिल २६ ते ऑगस्ट २६ दरम्यान नियोजित प्रवास रद्द केला. या प्रवाशांच्या रद्द झालेल्या तिकिटांपोटी रेल्वे प्रशासनाने तब्बल २२७ कोटी ६६ लाख रुपयांचा परतावा दिला आहे; तसेच तिकीट रद्द करण्याच्या वेळेनुसार आकारण्यात आलेल्या शुल्कातून रेल्वेच्या तिजोरीत २७ कोटी ७१ लाख रुपये जमा झाले आहेत.
पुणे रेल्वे विभागातून लांब पल्ल्याच्या आणि लोकलसह दोनशेहून अधिक रेल्वेगाडया धावतात. या गाड्यांमधून दररोज सुमारे पावणेदोन लाख प्रवासी प्रवास करतात. अनेक प्रवासी आगाऊ तिकीट आरक्षण करतात; मात्र, ऐनवेळी उद्भवणाऱ्या कौटुंबिक अथवा वैयक्तिक अडचणी अनेकांना प्रवास रद्द करावा लागतो अथवा हवामानातील बदल, तसेच वाहतुकीतील व्यत्ययामुळे रेल्वेकडून गाड्या रद्द केल्या जातात. त्यामुळे अनेकजण तिकिटाचा परतावा मागतात.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत पुणे रेल्वे विभागातील (एप्रिल २६ ते ऑगस्ट २६ ) २५ लाख ४२ हजार ६४५ प्रवाशांनी आरक्षित तिकीट रद्द केले. या प्रवाशांना रेल्वेने तब्बल दोनशे २२७ कोटी ६६ लाख रुपयांचा परतावा दिला आहे. रेल्वे प्रशासनाने एखादी गाडी रद्द केल्यास मात्र प्रवाशांना नियमानुसार तिकिटाच्या संपूर्ण रकमेचा परतावा दिला जातो. तसेच गाडीचा मार्ग बदल्यानतंर संबंधित प्रवाशांचे स्थानक नव्या मार्गावर येत नसल्यासही त्याला तिकीट रद्द करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. अशा पद्धतीने तिकीट रद्दच्या शुल्कातून रेल्वेच्या तिजोरीत २७ कोटी ७१ लाख रुपये जमा झाले आहेत.
तिकीट रद्दचा नियम
प्रवासाच्या ७२ तासांपेक्षा आधी तिकीट रद्द केल्यास किमान निश्चित रद्दीकरण शुल्क वजा करून उर्वरित रक्कम परत दिली जाते, तर ७२ ते २४ तासांदरम्यान तिकटी रद्द केल्यास भाड्याच्या २५ टक्के रक्कम कापली जाते. २४ ते आठ तासांदरम्यान तिकीट रद्द केल्यास भाड्याच्या ५० टक्के रक्कम कापली जाते. प्रवासासाठी आठ तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना तिकीट रद्द केल्यास कोणताही परतावा प्रवाशांना मिळत नाही.
पावसामुळे गाड्या रद्द
जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला होता. घाटमार्गातील वाहतूक विस्कळीत झाल्याने काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच बदलेल्या मार्गांमध्ये नियोजित स्थानके नसल्याने अनेक प्रवाशांना तिकीट रद्द करावी लागली. त्यामुळे चालू महिन्याच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत तिकीट रद्द करण्याचे प्रमाण अधिक होते.
जून-जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाल्याने विविध मार्गांच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. काही प्रवाशांनी प्रवाशाचा अंदाज घेता स्वत:च प्रवास करणे टाळले होते. लोणावळा मार्गावर दरड कोसळल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या गाड्या रद्द केल्या गेल्या होत्या. तसेच प्रवाशांना तिकिटांचे पैसैदेखील देण्यात आले. रेल्वेच्या नियमानुसार तिकीट रद्द केल्यास संबंधित प्रवाशांना योग्य तो परतावा दिला जातो.
हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी.