खराळवाडी: पिंपरी ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पीएमपी बसमधून प्रवास करण्यासाठी ऑनलाइन तिकीटसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, या सेवेत वारंवार तांत्रिक अडचणी येत असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मोबाईलवरून तिकीट काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर व्यवहार अयशस्वी होणे, तिकीट जनरेट न होणे किंवा पैसे वजा होऊनही तिकीट न मिळणे, अशा तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत.
दैनंदिन कामानिमित्त पीएमपी बसचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी ऑनलाइन तिकीट सुविधा वेळ वाचविणारी ठरणे अपेक्षित आहे. मात्र, सेवा सुरळीत न मिळाल्याने अनेकदा प्रवाशांना वाहकाकडून तिकीट घ्यावे लागत आहे. काही प्रवाशांच्या मोबाईलमधून रक्कम वजा झाल्यानंतरही तिकीट उपलब्ध होत नसल्याने संभ्रम निर्माण होत आहे.
ऑनलाइन तिकीट काढण्याची सुविधा असल्यामुळे बसमध्ये चढण्यापूर्वीच तिकीट घेता येते. मात्र, अनेकदा ॲप किंवा ऑनलाइन प्रणाली व्यवस्थित काम करत नाही. पैसे वजा झाले तरी तिकीट मिळाले नाही तर प्रवाशांनी नेमके काय करायचे, याबाबत स्पष्ट माहिती मिळत नाही. पीएमपी प्रशासनाने ही सेवा तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम करावी, अशी प्रतिक्रिया एका नियमित प्रवाशाने दिली.
ऑनलाइन तिकीट सेवेसाठी प्रवाशांच्या अपेक्षा
ऑनलाइन तिकीटसेवा २४ तास सुरळीत उपलब्ध असावी.
पैसे वजा होऊन तिकीट न मिळाल्यास परताव्याची प्रक्रिया सुलभ असावी.
तांत्रिक बिघाडाची माहिती प्रवाशांना तत्काळ मिळावी.
तक्रारींसाठी स्वतंत्र आणि प्रभावी मदत व्यवस्था असावी
सुट्या पैशांची अडचण टाळण्यासाठी ऑनलाइन तिकिटाचा पर्याय वापरतो. पण सेवा बंद किंवा स्लो असल्याने ऐनवेळी वाहकाकडून तिकीट घ्यावे लागते. प्रवाशांना त्रास होणार नाही, यासाठी तक्रारींचे तातडीने निराकरण होणे गरजेचे आहे.जीवन फुले, प्रवासी
गेल्या चार दिवसांपासून ऑनलाइन तिकीट सेवेत तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे बसमधील ऑनलाइन क्यूआर कोड स्कॅन होत नसल्याने प्रवाशांना तिकीट काढताना अडचणी येत आहेत. ऑनलाइन सेवा बंद असल्याची सूचना आम्ही प्रवाशांना देत असून, त्यांच्याकडून तिकिटाचे पैसे घेऊन तिकीट देत आहोत. तांत्रिक अडचण दूर होऊन ऑनलाइन तिकीटसेवा पूर्ववत होईल.वाहक, पीएमपीएल.