पिंपरी: गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने पंतप्रधान आवास योजनेचा (शहरी विभाग) दुसरा टप्पा जाहीर केला आहे. त्यामध्ये परवडणार्या घरांच्या व्याप्ती व गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी अद्ययावत निकष लागू केले आहेत.
त्यात 30 चौरस मीटरऐजवी 45 चौरस मीटर चटई क्षेत्रफळाचे सदनिका बांधण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून 9 ठिकाणी प्रकल्प राबविले जाणार आहे. रावेत गृहप्रकल्पास 2.0 मध्ये मान्यता मिळाली असून, त्या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले. (Latest Pimpri News)
महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत चर्होली, बोर्हाडेवाडी, आकुर्डी, पिंपरी हे प्रकल्प पूर्ण केले आहेत. तेथील सदनिका लाभार्थ्यांना हस्तांतरित केले आहेत. डुडुळगाव येथे गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. जे प्रकल्प चालू स्थितीत आहेत, ते पूर्ण करण्यास 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यातच केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना 2.0 जाहीर केली आहे. त्यामध्ये काही प्रमुख बदल केले आहेत.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने विकास आराखड्यातून आर्थिक दुर्बल घटक वर्गासाठी 9 भूखंड आरक्षित केले आहेत. एचडीएचअंतर्गत अतिरिक्त भूखंड निश्चित केले आहेत. उपलब्ध भूखंडानुसार या टप्प्यांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. रावेत येथील आगामी गृहप्रकल्पासाठी महापालिकेने सल्लागाराची नियुक्ती करून नियोजन प्रक्रिया सुरू केली आहे.
तीनऐवजी सहा लाखांची उत्पन्न मर्यादा
दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता (ईडब्ल्यूएस) उत्पन्न मर्यादा 3 लाख रुपयांवरून 6 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. सदनिकेचे किमान कार्पेट क्षेत्रफळामध्ये वाढ करण्यात आली आहे. ते 30 चौरस मीटरवरून 45 चौरस मीटरपर्यंतपर्यंत करण्यात आले आहे. याशिवाय, पात्र झोपडपट्टीवासीयांनाही या योजनेच्या कक्षेत समाविष्ट करण्यात आले आहे. योजना अधिक सर्वसमावेशक बनविण्यात आली आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.