

Charholi artisans busy preparing eco-friendly Ganesh idols
गिरीश जानवेकर
चर्होली: चर्होली परिसरात कारागिरांकडून गणेशमूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर काही ठिकाणी गणेशमूर्ती विक्रेत्यांनी स्टॉल लावून बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे गणरायाच्या आगमनाची चर्होलीकरांना आस लागली आहे.
यंदाच्या वर्षीपासून राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्यउत्सव म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे साहजिकच यंदाचा गणेशोत्सव विशेष ठरणार आहे. मूर्तिकारांचे हात मूर्ती घडवण्यात आणि रंगरंगोटी करण्यात व्यस्त आहेत. बहुतेक ठिकाणी ज्या मूर्ती बुक झाले आहेत, त्या मूर्तींची रंगरंगोटी चालू आहे. त्याचप्रमाणे, सोनेरी काम चालू आहे. (Latest Pimpri News)
यंदा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना न्यायालयाने मान्यता दिली. त्यामुळे संपूर्ण व्यवसायावर या निकालाचा परिणाम झाला. उशिरा निकाल आल्यामुळे कारागिरांना कच्चामाल आणून मूर्ती तयार करायला उशीर झाला. त्याचप्रमाणे कमी कालावधीत जास्त काम करायचे असल्यामुळे कारागीर मिळणे अवघड झाले. त्याचप्रमाणे, कारागीर कमी असल्यामुळे रोजगारातदेखील वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षी गणेशमूर्ती महाग होणार आहेत.
कारण वेळ कमी पडल्यामुळे एकूण व्यवसायावर आर्थिक ताण निर्माण झाला आहे. यावर्षी गणेशमूर्तीदेखील कमी प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. कारण शाडू मातीच्या मूर्तींसाठी लागणारी माती पेणवरून आणावी लागते.
पीओपी मूर्तीसाठी लागणारा कच्चामाल राजस्थानवरून महाराष्ट्रात येतो. शाडू मातीच्या मूर्ती सुकायला दोन दिवस लागतात. त्यानंतर रंगकाम करायला अजून वेळ लागतो. त्यामुळे ज्या ग्राहकांची विशेष मागणी असते त्यांनाच फक्त शाडू मातीच्या मूर्ती बनवून दिल्या जातात.
असे चालते गणरायाच्या मूर्तीचे काम
सुरुवातीला मूर्ती साच्यामधून काढली जाते. त्यानंतर मूर्तीला हात आणि सोंड बसवले जातात. मूर्ती रंगवतानादेखील आधी बॉडी शेडिंग आणि बॉडी कलर दिला जातो. त्यानंतर डोळ्यांची आखणी केली जाते.
त्यानंतर उपरणे आणि पितांबर आधी रंगवले जाते. त्यानंतर पाट आणि इतर दागिने व मुकुट रंगवले जातात. मूर्तीचे दागदागिने रंगविण्याचे सोनेरी काम सर्वात शेवटी केले जाते. मूर्तीचे डोळे बनवण्याचे काम सर्वात अवघड असते. काही ठराविक अनुभवी कारागिरांनांच मूर्तीचे डोळे हुबेहूब बनवता येतात. डोळे काढायला जास्त वेळ लागतो.
सध्या शाडू मातीच्या मूर्तींना मागणी आहे. मात्र, शाडू मातीच्या मूर्ती बनवायला आणि मूर्ती सुकायला वेळ लागतो. लाल मातीच्या मूर्ती आणि शाडू मातीच्या मूर्ती तुलनेने महाग असतात. पण पीओपी मूर्ती तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त असतात. रंगांच्या किंमती वाढल्यामुळे साहजिकच मूर्तीची किंमत पण वाढते.
- भानुदास कुंभार, मूर्तिकार, चर्होली.
यंदा न्यायालयाने पीओपी मूर्तीना परवानगी दिली आहे. परंतु, हा निकाल उशिरा आल्याने पीओपी मूर्ती कमी प्रमाणात आहेत. शिवाय कालावधी कमी असल्यामुळे कारागिरांची मजुरीदेखील वाढली. शिवाय मूर्तींची संख्या कमी असल्यामुळे आणि मागणी जास्त असल्यामुळे यावर्षी मूर्ती दरवर्षीपेक्षा थोड्या महाग असणार आहेत.
- योगेश कुंभार, मूर्तिकार, चर्होली.