आले रे आले..! उद्योगनगरीत बाप्पाचे वाजत-गाजत आगमन Pudhari
पिंपरी चिंचवड

Ganesh Chaturthi 2025: आले रे आले..! उद्योगनगरीत बाप्पाचे वाजत-गाजत आगमन

पूजा साहित्य खरेदीस गर्दी

पुढारी वृत्तसेवा

Ganesh Chaturthi Muhurat 2025

पिंपरी: येणार.. येणार.. म्हणून भक्तगण ज्याची आतुरतेने वाट बघत होते, त्या लाडक्या बाप्पाची आज बुधवार (दि. 27) प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश मूर्तीच्या स्टॉलवर गर्दी दिसून आली.

अनेक भाविक-भक्त मंगळवार (दि. 26) ‘गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया’ ‘आले रे आले गणराय आले’ च्या जयघोषात बाप्पाची मूर्ती वाजत-गाजत घरी नेताना दिसून आले. बाजारपेठांतही प्राणप्रतिष्ठापना पूजेसाठी लागणार्‍या साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी झाली होती. शहरात पुढील अकरा दिवस उत्साह आणि चैतन्याचे वातावरण असणार आहे. Ganesh Chaturthi

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीस बाप्पाचे आगमन होते. बुधवार (दि. 27) पासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. पुढील अकरा दिवस सगळीकडे चैतन्याचे वातावरण असेल. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी अनेकांनी आपल्या कामातून, व्यवसायातून वेळ काढून खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. गेल्या दोन दिवसांपासून रिपरिप सुरू असल्याने खरेदीचा वेग थोडा मंदावल्यासारखा होता; मात्र मंगळवारी पावसाच्या रिपरिपीस न जुमानता नागरिक गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी घराबाहेर पडले होते.

पिंपरी बाजारपेठ

शहरात सर्वाधिक मोठी आणि स्वस्त वस्तू मिळणारे ठिकाण म्हणजे पिंपरी बाजारपेठ या ठिकाणी विविध प्रकारचे सजावट साहित्य, पूजा साहित्य, धान्य, कपडे, इलेक्ट्रीक वस्तू मिळत असल्याने दोन दिवसांपासून पिंपरी बाजारपेठ गर्दीने फुलून गेली होती. त्यात सर्वाधिक सजावटीसाठी कापड, रंगीबेरंगी फुले, विद्युत माळा खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.  (Latest Pimpri News)

चिंचवड बाजारपेठ

चिंचवड बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात गर्दी असते. चिंचवडमधील गांधी पेठ रस्ता, भाजी मंडई परिसरात पूजाचे साहित्य, फुले, हार खरेदीसाठी गर्दी झाली होती. पावसामुळे पिंपरी बाजारपेठेत जाणे शक्य नसल्याने अनेकांनी चिंचवड बाजारपेठेत खरेदी केली. तसेच, बाजारात असलेल्या मातीच्या व पर्यावरणपूरक मूर्तीकडे सर्वांचेच लक्ष वेधले होते. अनेक विक्रेत्यांनी यंदा गणेश मूर्तीबरोबर रोपाची कुंडी मोफत देण्याचे उपक्रमही राबवला होता.

दुपारी दीडपर्यंत प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त

गणेशोत्सव प्राणप्रतिष्ठापनाची वेळ बुधवार (दि. 27) सकाळी 11 वाजून 21 मिनिटे ते दुपारी 1 वाजून 51 मिनिटांपर्यंत असणार आहे. या शुभ मुहूर्त पूजा आणि प्राणप्रतिष्ठापना करण्याचे आवाहन गुरुजींकडून करण्यात आले आहे.

ऑनलाईन खरेदीकडे कल

नोकरी, व्यवसायानिमित्त खरेदीसाठी बाहेर पडणे अशक्य असल्याने अनेकांनी ऑनलाईनवर भर दिला. त्यात अगदी सजावट साहित्यापासून ते मिठाईपर्यंत खरेदी केली. तसेच, अनेकांनी या सणानिमित्त नवीन वस्तूदेखील खरेदी केली. ऑनलाईन साईट, संकेतस्थळावर वेगवेगळ्या योजना, डिस्काउंट असल्याने याकडे कल होता.

बालचमूंचा उत्साह शिगेला

गणेशोत्सवात बालचूमंसाठी अतिशय उत्साहाचे वातावरण असते. अगदी बाप्पाच्या आगमनापासून ते आरतीपर्यंत त्याची घरात लुडबूड असते. घर सजवणे, आरास करणे, गोडधोड खाणे यासाठी त्याचा हा उत्सव आवडीचा असतो. या काळात विविध उत्सव, स्पर्धादेखील घेण्यात येत असल्याने त्यात आनंदाने सहभागी होतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT