

पिंपरी: येत्या बुधवारी गणरायाचे आगमन होणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांची जय्यत तयारी सुरु असतानाच नैवेद्याची विशेष तयारी केली जाते. दररोज बाप्पाला त्याच्या आवडीचा नैवेद्य अर्पण करण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत.
दहा दिवस विविध प्रकारच्या पक्वानांचा नैवेद्य असतो. भाविकांची गरज पाहता विविध फ्लेवरचे मोदक बाजारात दाखल झाले आहेत. उकडीच्या मोदकांसह फ्लेवरचे मोदकही नागरिकांच्या पसंतीस उतरत आहेत. (Latest Pimpri News)
गणेशोत्सवामध्ये दररोज दहा दिवस गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. नैवेद्यासाठी सर्व प्रकारची मिठाई असतेच. मात्र, गणपतीचा आवडता पदार्थ म्हणून विविध फ्लेवर्सचे मोदक बाजारात यायला लागले आहेत. Ganesh Chaturthi
काजूकतली, विविध प्रकारच्या बर्फी यांना तुलनेने कमी मागणी असते. यामध्ये काजू मोदक, गाजर मोदक, गुलकंद मोदक, चीज - स्वीट- कॉर्न मोदक, चॉकलेट मोदक, पनीर मोदक, बुंदी मोदक, तळलेले मोदक, उकडीचे मोदक, रवा मोदक, सुक्या मेव्याचे मोदक, डार्क चॉकलेट मोदक, ओल्या नारळाचे मोदक, पंचखाद्य मोदक, गुलाबजाम मोदक, पान मोदक अशा प्रकारचे मोदक नैवद्यासाठी उपलब्ध आहेत. यांचे दर साधारणत: 600 रूपये किलो पर्यंत आहेत.
नारळ, सुके खोबरे महागले
यावेळी नारळ, सुका खोबरे महाग झाल्याने नैवेद्य खर्चिक झाला आहे. गणपतीदरम्यान नारळाला नेहमीच मागणी वाढते. पण नारळाची किंमत चांगलीच वाढली आहे. पूर्वी 30 ते 35 रुपयांना मिळणारा नारळ आता 40 ते 45 रुपये प्रतिनग दराने विकला जात आहे.
तर 300 रुपये किलोच्या आसपास असलेले सुके खोबरे आता 400 ते 440 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे नैवेद्यासाठी तयार करण्यात येणार्या उकडीच्या मोदकांची किंमतही वाढली आहे. दरवेळी 20 - 30 रुपयांना असलेला उकडीचा मोदक आता 40 रुपयांना मिळणार आहे. नैवेद्य असलेल्या पंचखाद्यात खोबरे, खारीक, खडीसाखर, खसखस वापरले जाते. यात सुक्या खोबर्याचा अधिक वापर केला जातो. खोबर्याच्या दरात झालेली वाढ पाहता यंदा खिरापत महाग झाली आहे.