खराळवाडी: पावसाने ओढ दिल्यामुळे महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला असल्यामुळे खराळवाडी परिसरात टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे. गांधीनगर, खराळवाडी, नेहरूनगर, मोरवाडी आणि आसपासच्या भागांत पाणीपुरवठा अनियमित होत असल्याच्या तक्रारी वाढल्या असून, नागरिक त्रस्त झाले आहेत.
गांधीनगर, खराळवाडी, पिंपरी कॅम्प, डिलक्स चौक, वैशालीनगर, नानेकरचाळ, रमाबाईनगर भागात नळाला कमी दाबाने पाणी आणि अवेळी पाणी येत आहे. त्यामुळे सोसायट्यांना टँकर मागविण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. एका टँकरसाठी नागरिकांना दीड ते तीन हजार रुपये मोजावे लागत आहेत. स्थानिक रहिवाशांनी सांगितले, की पाणीपुरवठा सुरळीत झाल्यास टँकरची गरज भासणार नाही. मात्र, अनियमित वितरणामुळे नागरिकांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. अनेक सोसायट्यांना आठवड्यातून एक-दोन वेळा टँकर मागवावा लागत आहे.
दरम्यान, वाढत्या मागणीमुळे खासगी टँकरचालकांचीही चांगलीच चांदी झाली आहे. काही ठिकाणी टँकर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. पाण्याची वाढती मागणी आणि मर्यादित उपलब्धता यामुळे टँकरचे दर वाढले आहेत. त्यामुळे महापालिकेने पाणीपुरवठा व्यवस्थेचे नियोजन अधिक प्रभावी करावे, गळती रोखावी, कमी दाबाच्या भागात आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांना नियमित व पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पिंपरी शहरातील सर्व उपनगरांत नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करावा, कमी दाबाच्या भागांत तातडीने तांत्रिक उपाययोजना कराव्यात, पाणीपुरवठ्यातील गळती व अडथळे दूर करावेत, टँकरवर अवलंबित्व कमी करण्यासाठी दीर्घकालीन जलव्यवस्थापन योजना राबवावी, एक दिवसाआडऐवजी नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, कमी दाबाच्या भागांमध्ये तातडीने उपाययोजना कराव्यात, पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक निश्चित करून त्याचे पालन करावे, गळती व अनधिकृत जोडण्यावर कठोर कारवाई करावी, तक्रारींवर तातडीने प्रतिसाद देण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी
गळती, अनधिकृत जोडण्या आणि तांत्रिक अडचणी दूर करून पाणीपुरवठ्याचे प्रभावी नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच, पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशीही मागणी होत आहे. उन्हाळा असो की पावसाळा नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करणे ही महापालिकेची मूलभूत जबाबदारी आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
दरात तीस ते साठ टक्के वाढ
पाणी ही मूलभूत गरज असून, नियमित पाणीपुरवठा न झाल्यास नागरिकांना टँकरच्या वाढत्या खर्चाचा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे महापालिकेने या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे. पाणीटंचाईमुळे खासगी टँकरचे दर ३० ते ६० टक्क्यांपर्यंत वाढल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. शहरात १,००० लिटरच्या टॅंकरसाठी १५० ते १७० रुपये आकारले जात आहे. तर, १,२०० लिटरसाठी २५० ते ३००, २,५०० लिटरसाठी ५०० ते ९००, ५,००० लिटरसाठी १,००० ते १,८००, ६,००० लिटरसाठी १,२०० ते रु २,०००, १०,००० लिटरसाठी २,००० ते ३,००० आणि १,२००० लिटरच्या टॅंकरसाठी २,५०० ते ३,५०० रुपये आकारले जात आहे.