Pimpri Traffic Warden Chain Snatching Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Traffic Warden Chain Snatching: पिंपरीत माजी ट्रॅफिक वॉर्डन अटकेत; दुचाकी चोरीतून चेन स्नॅचिंग

जप्त वाहन चोरी करून महिलांचे दागिने लुटले; 4.75 लाखांचा मुद्देमाल जप्त, वाकड पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: वर्तणूक चांगली नसल्याच्या कारणावरून ट्रॅफिक वॉर्डन म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाला कामावरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्याने वाहतूक पोलिसांनी जप्त केलेली दुचाकी चोरी केली आणि त्या चोरलेल्या दुचाकीवरून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरले. याप्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपी ट्राफिक वॉर्डनला अटक केली आहे.

सचिन मानसिंग चव्हाण (27, रा. बोडकेवस्ती, माण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 एप्रिल रोजी सकाळी थेरगाव मधील गणेश मंदिर येथे सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या एका महिलेचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्याने चोरून नेले होते. याबाबत वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वाकड पोलिसांच्या पथकाने परिसरातील सुमारे 150 सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा येण्या-जाण्याचा मार्ग निश्चित केला आणि संशयित आरोपी सचिन चव्हाण याला माण येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने थेरगाव येथील चोरीसह आणखी एक चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चतुःशृंगी येथे वाहन चोरीचा गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे.

पोलिसांनी सचिनकडून दोन दुचाकी, 23 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण 4 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी सचिन चव्हाण हा यापूर्वी चतुःशृंगी वाहतूक विभागात ट्रॅफिक वॉर्डन म्हणून काम करत होता. त्याची वर्तणूक चांगली नसल्याने त्याला पाच महिन्यांपूर्वी कामावरून काढून टाकले होते. त्यानंतर आरोपीने मार्च 2026 दरम्यान वाहतूक विभागाजवळ डिटेन करून ठेवलेल्या दुचाकींमधील एक मोपेड चोरी केली आणि त्याच दुचाकीचा वापर करून चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कडलग, पोलिस निरीक्षक किशोर पाटील, सहायक निरीक्षक अंबरीश देशमुख, श्रीनिवास दराडे, उपनिरीक्षक बिभीषण कन्हेरकर, सहायक उपनिरीक्षक संदीप गवारी, कॉन्स्टेबल वंदू गिरे, तात्यासाहेब शिंदे, कौंतेय खराडे, विक्रम भगत यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT