

पिंपरी: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) गृहनिर्माण आणि अभियांत्रिकी क्षेत्रात जागतिक स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा नवा झेंडा फडकावला आहे. चिखली येथील सेक्टर 12 गृहनिर्माण प्रकल्पात अवघ्या 95 दिवसांत 14 मजली इमारत उभी करण्याचा पराक्रम केला आहे. या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेत आशिया बुक ऑफ रेकॉड्र्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉड्र्समध्ये या विक्रमाची सुवर्णाक्षरांनी नोंद करण्यात आली आहे. यापूर्वीचा आपला 100 दिवसांचा जुना विक्रम मोडीत काढत बांधकामाचा नवा मापदंड प्रस्थापित केला.
मंगळवारी (ता. 14) चिखली येथील प्रकल्पस्थळी आयोजित सोहळ्यात आशिया बुक ऑफ रेकॉड्र्सचे परीक्षक अशोक अदाक यांनी अधिकृत प्रमाणपत्र व पदक देऊन पीएमआरडीएचा गौरव केला. प्राधिकरणाच्या वतीने मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी हा बहुमान स्वीकारला. पीएमआरडीएचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली हा यशस्वी प्रकल्प राबविण्यात आला.
कामगारांनी केले अहोरात्र काम
हे काम पूर्ण करण्यासाठी कामगारांनी अहोरात्र काम केले. अत्याधुनिक प्रीकास्ट आरसीसी तंत्रज्ञान आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता ही इमारत विक्रमी वेळेत पूर्ण झाली. ही वास्तू पूर्णपणे भूकंपप्रतिरोधक असून, शाश्वत नागरी विकासाचे उत्तम उदाहरण ठरली आहे.
या गृहनिर्माण प्रकल्पात आम्ही मिशन 95 डेज हे मोठे आव्हान स्वीकारले होते. अभियांत्रिकी कौशल्य आणि अचूक नियोजनाच्या जोरावर 14 मजली डी-3 नावाची इमारत केवळ 95 दिवसांत पूर्ण करून आम्ही हा टप्पा गाठला. ही यशस्वी अंमलबजावणी प्रामुख्याने 3-एस प्रीफॅब टेक्नॉलॉजी व झीरो लॅग शेड्युलिंग आणि अहोरात्र चालणाऱ्या थी-शिफ्ट वर्किंग मॉडेलवर आधारित आहे. गुणवत्तेचा दर्जा राखून सर्वसामान्यांना विक्रमी वेळेत हक्काची घरे उपलब्ध करून देणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे.
रिनाज पठाण, मुख्य महानगर अभियंता, पीएमआरडीए