UDISE Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Student Aadhaar UDISE Error: पिंपरीतील हजारो विद्यार्थी आधार-यू-डायस नोंदणी गडबडीत शालेय नोंदी संकटात

नोंदणीतील त्रुटींमुळे प्रत्यक्ष वर्गात बसणारे विद्यार्थी सरकारी नोंदीत शाळेबाहेर दाखवले जात आहेत

पुढारी वृत्तसेवा

वर्षा कांबळे

पिंपरी: आधार आणि यू-डायस प्लस या पोर्टलवरील शैक्षणिक नोंदणीतील गंभीर त्रुटींमुळे हजारो विद्यार्थी सरकार दप्तरी ‌‘गायब‌’ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरातील 2 लाख 96 हजार 778 विद्यार्थी शालाबाह्य ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याचा थेट फटका शाळांना बसण्याची शक्यता आहे. या प्रणालीतील घोळामुळे अनेक शाळांमधील प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थी कागदोपत्री उपस्थित नाहीत. विद्यार्थ्याचे नाव, जन्म तारीख किंवा लिंगातील तफावतीमुळे 13 हजार 867 विद्यार्थ्यांचे आधार अवैध ठरत आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय नोंदी संकटात सापडल्या आहेत. परिणामी, लाखो विद्यार्थी शालाबाह्य किंवा अवैध ठरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन संचमान्यता करण्यात येते. सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची आधारकार्डच्या आधारे नोंदणी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड अद्ययावत नसलेले 2 लाख 96 हजार 778 विद्यार्थी शाळाबाह्य ठरलेले असताना आता आधार कार्ड वैधतेविना 13 हजार 867 विद्यार्थी शालाबाह्य ठरण्याबरोबच सरकारी योजनांचा लाभ मिळण्यात समस्या येत आहेत.

विद्यार्थी वर्गात हजर, पण रेकॉर्डमध्ये बाहेर

यू-डायस प्लस प्रणालीमध्ये आधार पडताळणी आवश्यक करण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांची नोंद अपात्र (इनवॅलिड), उपलब्ध नसलेले (नॉट प्रोवेडेड) किंवा पडताळणीतील (अंडर व्हेरिफिकेशन) अशा फ्लॅगमध्ये अडकली आहे. त्यामुळे विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात नियमित बसत असतानाही तो सरकारी रेकॉर्डमध्ये शाळेबाहेर दाखवला जात आहे. या विद्यार्थ्यांना शालाबाह्य (आऊट ऑफ स्कूल) म्हणून वर्गीकृत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे शाळांच्या विद्यार्थी संख्येवर परिणाम होत असून, त्याचा थेट फटका शिक्षक भरती, अनुदान, मध्यान्ह भोजन योजना, शिष्यवृत्ती आणि इतर शैक्षणिक सुविधांवर बसत आहे.

यू-डायस नोंदणीमधील चुका दुरुस्त करण्यासाठी कॅम्प आयोजित केले जात आहेत. आधार, यू-डायस प्लससाठी नोंदणी करण्यासाठी सतत ऑनलाइन व ऑफलाइन माध्यमातून बैठका सुरू आहेत. विद्यार्थ्यांकडे वैध आधार कार्ड असणे आवश्यक आहे. मात्र, विद्यार्थी व पालक यांच्या आधार कार्डमध्ये चुका असल्याने अपार नोंदणी होत नाही.
संगीता बांगर (प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT