NCMC Card Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri NCMC Smart Card: पिंपरीत NCMC कार्ड वितरणात गोंधळ; ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास, व्यवस्थेवर संताप

एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड वितरणातील अडचणींमुळे प्रवाशांची गैरसोय; उघड्यावर चाललेल्या प्रक्रियेवर शिस्तबद्ध व्यवस्थेची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू केलेल्या राष्ट्रीय सामायिक गतिशीलता कार्ड (एनसीएमसी) वितरणातील गैरव्यवस्थेमुळे नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, दृष्टिबाधित आणि विद्यार्थ्यांसह विविध प्रवर्गांसाठी उपयुक्त ठरणारे हे स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी एसटी स्थानकांवर मोठी गर्दी होत असून, अपुर्‍या नियोजनामुळे अनेक ठिकाणी वादविवाद आणि गोंधळाचे प्रकार घडत आहेत.

हे कार्ड 199 रुपयांत उपलब्ध करून दिले जात असले, तरी त्याच्या वितरणाची पद्धत नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. एसटी महामंडळाने कार्ड निर्मिती आणि वितरणासाठी दोन वेगवेगळ्या संस्थांना कंत्राटे दिली आहेत. एका पद्धतीत नागरिक एसटी संकुलातील केंद्रावर अर्ज करून काही दिवसांत कार्ड प्राप्त करतात. तर दुसर्‍या पद्धतीत खासगी एजंटांकडे नोंदणी व वितरणाची जबाबदारी देण्यात आली आहे. हे एजंट त्यांच्या सोयीनुसार विविध ठिकाणी कार्डांचे वितरण करत असल्याने व्यवस्थापनाचा पूर्णपणे अभाव दिसून येत आहे.

सध्या पिंपरी-चिंचवड बसस्थानकाबाहेरील पीएमपीएमएल बसथांब्यावर उघड्यावर कार्डांचे वितरण सुरू आहे. टेबलांवर शेकडो कार्डांचे गठ्ठे ठेवले जात असून, नागरिकांना त्यामधून स्वतःचे कार्ड शोधावे लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना भर उन्हात दीर्घकाळ उभे राहून नाव शोधण्याची वेळ येत असल्याने त्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.

अनेकांना गर्दीमुळे धक्काबुक्कीचा सामना करावा लागत असून, कार्ड हरवण्याची किंवा चुकीच्या व्यक्तीकडे जाण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.या संपूर्ण प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, खासगी एजंटांच्या मनमानीला आळा घालावा, वितरणासाठी शिस्तबद्ध टोकन प्रणाली, स्वतंत्र प्रतीक्षा व्यवस्था आणि सुरक्षित केंद्रांची उभारणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि ज्येष्ठांनी केली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेली योजना गैरव्यवस्थेमुळे त्रासदायक ठरू नये, यासाठी एसटी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT