

विजय जगदाळे
भोसरी: नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच पालकांना धडकी भरती ती शाळेतूनच महागड्या पुस्तक व वही खरेदी करण्याची. अनेक खासगी शाळांकडून पुस्तक व वही खरेदीसंदर्भात मनमानी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शाळेतूनच शालेय साहित्य घेतल्याशिवाय पर्याय नसल्याने पालक हतबल झाले आहेत. आधीच महागाईने कंबरडे मोडलेले पालक कारवाईच्या भीतीने आपल्या पाल्ल्याला मानसिक त्रास दिला जाईल यामुळे शाळा व्यवस्थापनाचा मनमानी कारभारासमोर हतबल झाले आहेत.
भोसरी परिसरात अनेक इंग्रजी माध्यमाचा शाळा आहेत. अनेक शाळांनी शालेय साहित्य शाळेतूनच घेतले पाहिजे किंवा शाळांनी निश्चित केलेल्या विक्रेत्याकडूनच पुस्तके व वह्या खरेदी करण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे पालकांचा खिशाला झळ बसत असल्याच्या तक्रारी पालकांकडून व्यक्त होत आहेत.
किमतीविना वह्यांची विक्री
अनेक शाळांकडून विशिष्ट लोगो किंवा डिझाइन असलेल्या वह्याच खरेदी करण्याची अट घातली जात असल्याने बाजारात कमी किमतीत उपलब्ध असलेल्या पर्यायांचा पालकांना उपयोग करता येत नाही. तसेच काही शाळांमध्ये विक्रीस ठेवण्यात आलेल्या वह्यांवर कमाल किरकोळ किंमत (MRP) छापलेली नसल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष किंमत किती आणि पालकांकडून किती रक्कम आकारली जात आहे. याबाबत काहीच ताळमेळ लागत नाही. शाळेने पारदर्शकता ठेवली पाहिजे अशी तक्रार पालक व्यक्त करत आहे. परिणामी शैक्षणिक साहित्याच्या नावाखाली अनावश्यक आर्थिक भार सहन करावा लागत आहे. मनमानी पुस्तक विक्रीवर शिक्षण विभाग आणि संबंधित प्रशासनाने लक्ष घालून शाळांची मनमानी रोखावी. तसेच पुस्तक व वही विक्रीत पारदर्शकता आणावी.
डिक्शनरी खरेदीचा घाट
विशेष म्हणजे, आज कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट आणि डिजिटल शिक्षणाचे युग असतानाही काही शाळांकडून विद्यार्थ्यांना महागड्या डिक्शनरी खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. मोबाईल आणि संगणकावर सहज उपलब्ध असलेली माहिती लक्षात घेता, अशा डिक्शनरीची सक्ती कितपत आवश्यक आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एकीकडे शिक्षणाचा दर्जा ढासळत चालला आहे. दुसरीकडे शिक्षणाचे मोठ्या प्रमाणावर बाजारीकरण झाले आहे. शिक्षण हा व्यवसाय नसून, विद्यार्थ्यांचा हक्क आहे. शाळांनी विशिष्ट दुकानातून पुस्तके-वह्या घेण्याची सक्ती थांबवावी आणि पालकांवरील अनावश्यक आर्थिक भार कमी करावा. शिक्षण विभागाने तक्रारीची वाट न बघता कारवाई केली पाहिजे.
त्रस्त पालक
पालकांनी शालेय साहित्य शाळेमधून घेऊ नये. पुस्तक-वही विक्रीबाबत नियमांचे उल्लंघन होत असल्यास तक्रारींची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याबाबत पर्यवेक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, मनपा