School Bus Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri School Bus Inspection: पिंपरी-चिंचवडमध्ये स्कूलबस तपासणीत ४,२५१ वाहने दोषी; १.६७ कोटींचा दंड

जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान १२,७५३ वाहनांची तपासणी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी चालकांच्या आरोग्य तपासणीचाही प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने लागू केलेल्या नियमावलीनुसार स्कूल बसगाड्या सुस्थितीत असणे बंधनकारक आहे. असे असताना अनेक स्कूलबसेस वाहतुकीचे नियम धुडकावून दामटवल्या जात आहेत. त्यामुळे पिंपरी प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) कडून जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूलबसगाड्यांची तपासणी करण्यात आली. आरटीओकडून १२ हजार ७५३ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४२५१ वाहने दोषी आढळले असून १ कोटी ६७ लाख रुपये एवढे तडजोड शुल्क आकारण्यात आले.

पिंपरी-चिंचवड शहरात खासगी आणि महापालिकेच्या मिळून सुमारे ६६५ प्राथमिक व उच्च माध्यामिक शाळा आहेत. यात सुमारे अडीच लाख विद्यार्थीं शिक्षण घेतात. काही खासगी शाळांनी विद्यार्थ्यांची ने- आण करण्यासाठी बस उपलब्ध करुन दिल्या आहेत. तर काही शाळांत खासगी स्कूल बसेस विद्यार्थ्यांची ने- आण करतात. या व्यातिरिक्त व्हॅन आणि रिक्षांमधूनही विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. शहर आणि परिसरात अशा सुमारे पाच हजार वाहनांची नोंद प्रादेशिक परिवहन आरटीओच्या कार्यालयात आहे.

पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला प्रधान्य देत आरटीओ प्रशासनाने जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान स्कूलबसगाड्यांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत अनेक स्कूल बसगाडयांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र नसणे, नियमानुसार टॅक्स न भरणे, वाहनाचा विमा काढलेला नसणे. अशा स्कूलबस गाड्यांवर आरटीओकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईत संबंधितांकडून १ कोटी ६७ लाख रुपयांचे तडजोड शुल्क आकारण्यात आले.

घटना : गेल्या काही दिवसांपूर्वी काळेवाडीत एका स्कूल बसचा अपघात झाला. या बसवरील चालकाला हृदय विकाराचा झटका आल्याने बस रस्त्यावरील दुभाजकावर आढळली. सुदैवाने बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र अशा घटनांवरून स्कूलबस वाहनचालकांच्या आरोग्य तपासणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

चालकही अनफिट?

बहुतांश चालकांचे वय ४० वर्षांपेक्षा अधिक आहे. वयाचा हा टप्पा पार केल्यानतंर शरीरात नैसर्गिक आणि संप्रेरकीय बदल होतात. या वयात जीवनशैली, आहाराच्या सवयी आणि आनुवांशिकता यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. त्यामध्ये गुडघेदुखी, कंबरदुखी, आणि सांधे सुजणे अशा विविध समस्या उदभवतात. त्यात रक्तदाब , ह्दयविकाराचा धोका वाढण्याचा जास्त प्रमाण आहे. त्यामुळे विद्यार्थी वाहतूकीच्या वाहन चालकांची नियमित आरोग्य तपासणी आवश्यक आहे. याकडे शालेय शिक्षण विभाग, आरटीओ प्रशासन, शाळा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

शालेय बस नियम काय?

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शासनाने शालेय बस नियमन नियम, २०२६ लागू केले आहेत. यामध्ये सर्व शालेय बस विद्यार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस विथ पॅनिक बटन, थेट लोकेशन दर्शविणारे लोकेशन ॲप सुविधा, विद्यार्थ्यांची डिजीटल नोंद, पालकांना सुचना देणारी प्रणाली, फायर डिटेक्शन, अलार्म सिस्टम, सीसटीव्ही, डिजीटल सेफ्टी मॉनिटरिंग सिस्टिम बसविणे बंधनकारक आहे.

पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने आरटीओकडून परवान्याशिवाय धावणाऱ्या स्कूल बसगाडयांवर वायुवेग पथकामार्फत तपासणी केली जाते. जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान १२ हजार ७५३ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. कारवाईत १ कोटी ६७ लाख रुपयांचे तडजोड शुल्क आकारण्यात आले.
राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT